ऑनलाईन ट्रोलिंगमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. काही बाबतीत हे प्रकरण संबंधित व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्यापर्यंतही जाऊ शकतं. चेन्नईमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये सोशल ट्रोलिंगचा परिणाम पीडित महिलेनं थेट आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यात झाल्याचं दिसून आलं आहे. या महिलेच्या लहान मुलाचा एक व्हिडीओ काही आठवड्यांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं घडलं काय?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका इमारतीच्या गॅलरीवर लावलेल्या शेडवर एक लहान मूल अडकल्याचा हा व्हिडीओ होता. हे मूल वरच्या गॅलरीतून खाली पडल्याची माहिती समोर आली होती. काही स्थानिकांनी मोठ्या हिकमतीनं या मुलाला छतावरून वाचवून सुखरूप खाली आणलं होतं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे त्या लहान मुलाला वाचवणाऱ्या स्थानिकांचं कौतुक होत जात असताना दुसरीकडे या मुलाच्या आईवर टीका व्हायला लागली होती. आईनं मुलाकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते मूल गॅलरीतून खालच्या शेडवर पडल्याचे दावे करण्यात येऊ लागले. सोशल मीडियावर या मुलाच्या आईला उद्देशून टीका होऊ लागली. तिनंच हलगर्जीपणा केला असेल, असंही बोललं जाऊ लागलं. मूल वाचल्यामुळे या आईचा जीव भांड्यात पडला असला, तरी या ट्रोलिंगमुळे आईवर प्रचंड मानसिक ताण येऊ लागला.
नैराश्यावर उपचार घेत होती महिला!
फ्री प्रेसनं ऑनलाईन मनोरमा न्यूजच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सदर ३३ वर्षीय महिला ही आयटी क्षेत्रात नोकरी करत होती. मात्र, या घटनेनंतर ही महिला नैराश्यावर उपचार घेत होती. एप्रिल महिन्यात मूल गॅलरीतून पडल्याची घटना घडल्यानंतर ही महिला मुलासह कोईम्बतूरमध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरी राहायला गेली होती. लोकांकडून होणारी हेटाळणी आणि टीका टाळण्यासाठी महिलेनं तिच्या आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, शनिवारी १८ मे रोजी ही महिला तिच्या पालकांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आसपासच्या नागरिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आलं. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळेच या महिलेनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याच्या प्रतिक्रिया आता काही नेटिझन्सकडून दिल्या जात आहेत.