देशामध्ये आधी शौचालये बांधा आणि मंदिरांचा विचार नंतर करा, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणाले. काल (बुधवार) दिल्लीमध्ये तरूणांसाठी आयोजित एका कार्यक्रमामध्ये मोदी बोलत होते.
आपली हिंदूत्ववादी नेता अशी ओळख आपल्याला असे वक्तव्य करण्याची परवानगी देत नसली, तरी आपण असे बोलण्याची हिम्मत करीत असल्याचे मोदी तरूणांशी संवाद साधताना म्हणाले.
“मी एक हिंदूत्ववादी नेता असल्यामुळे मला तसे बोलण्याची परवानगी नाही, मात्र, मी तसे बोलण्याची हिम्मत करतो आहे. यामागील माझा दृष्टिकोन ‘पहिली शौचालये, नंतर देवालये’ असा आहे,” असे मोदी म्हणाले.
मोदींच्या या वक्तव्यावरून भाजपमध्ये व मंदिराच्या मुद्यावर ठाम असलेल्या भाजपच्या इतर भातृभावी संघटनांमध्ये खळबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केलेल्या अशाच एका वक्तव्यावरून बऱ्याच हिंदूत्ववादी संघटना व महिला संघटना निषेधासाठी रस्त्यावर आल्या होत्या. मंदिरांपेक्षा देशामध्ये शौचालये महत्त्वाची आहेत, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.
खेड्यांमध्ये लाखो रूपये मंदिरे उभारण्यात खर्च केले जात आहेत. मात्र, शौचालये बांधली जात नाहीत, असे विकासाचा मुद्याला उचलून धरत मोदी म्हणाले.
शौचालयांच्या अभावामुळे देशामध्ये आज देखील महिलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागत असल्याचे मोदी म्हणाले.
सुशासन आणि तातडीच्या प्रगतीसाठी नेतृत्व कणखर असणे आवश्यक असल्याचे मोदी शेवटी म्हणाले.

Story img Loader