Toll Rates: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कायमच वाहन चालकांनी वाहतूक नियम पाळावे यासाठी आग्रही असतात. त्यांनी यापूर्वी संसदेततही भारतात वाहतूक नियम न पाळल्यामुळे झालेल्या अपघातांची माहिती दिली आहे. ज्यातून भयावह आकडेवारी समोर आली आहे. अशात आता वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगताना गडकरी यांनी खुलासा केला आहे की, नियम मोडल्यामुळे मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंकवर त्यांच्या कारला देखील दोन वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर त्यांनी, येत्या ८-१० दिवसांत टोल शुल्क कमी करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

१० दिवसांत होणार टोल कपात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते टोलमुक्त करण्याबाबत बोलताना म्हटले की, “टोल भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी या धोरणावर काम सुरू आहे. याबाबत ८-१० दिवसांत घोषणा केली जाईल. टोलची रक्कम १०० टक्के कमी केली जाईल. मी आत्ता तुम्हाला एवढेच सांगू शकतो.” दरम्यान सीएनएन-न्यूज१८ च्या रायझिंग इंडिया समिट २०२५ मध्ये बोलताना गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.

बांद्रा-वरळी सी लिंकवर दोन वेळा दंड

“मी बांद्रा-वरळी सी लिंक बांधला. माझी मुंबईत एक गाडी आहे. त्या गाडीला वांद्रे-वरळी सी लिंकवर दोन वेळा दंड आकारण्यात आला आहे. मला ५०० रुपये द्यावे लागले. यातून कोणीही सुटू शकत नाही, कॅमेऱ्यात सर्वकाही कैद होते. लोक अनेकदा दंडाबद्दल तक्रार करतात, परंतु त्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. दंड महसूल वाढविण्यासाठी नाही, शिस्त लावण्यासाठी आहे” असे नितीन गडकरी यांनी पुढे सांगितले.

याचबरोबर, नितीन गडकरी यांनी सांगितले की, दररोज १०० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी लोकांनी वाहतूक नियम पाळणे महत्त्वाचे असेल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, रस्ते अपघातातील बहुतेक मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात.

रस्ते बांधणी अपघातांचे कारण

यावेळी रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, “दुर्दैवाने, आपण हे लक्ष्य साध्य करू शकलो नाही. अपघातांचे कारण रस्ते बांधणी आहे. रस्ते बांधणीत काही त्रुटी होत्या. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आम्ही ४०,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. राहवीर योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा आम्ही केली आहे.”