महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील जे जिल्हे गोव्यालगत आहेत तेथून येणाऱ्या वाहनांसाठी टोल शुल्कात सवलत देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.
सिंधुदुर्ग, बेळगाव, कारवार आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांमधून येणाऱ्या वाहनांना टोल शुल्कात सवलत देणारे पास येत्या १५ दिवसांत देण्यात येतील, असे गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी सांगितले.
जी वाहने सातत्याने गोव्यात येत असतात त्यांना हे पास देण्यात येणार आहेत. गोवा सरकारने १५ एप्रिलपासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर टोल शुल्क लादले असल्याने त्याविरोधात वाहतूकदारांच्या विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सीमेवरील सर्व तपासणी नाक्यांवरून राज्य सरकार प्रतिदिनी ८ ते १० लाख रुपये टोल शुल्क गोळा करते. त्याविरुद्ध वाहतूकदारांनी संप पुकारला होता. मात्र भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने वाहतूकदारांनी संप मागे घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा