गोवा सरकारने राज्याच्या आसपासच्या गावातून म्हणजेच महाराष्ट्र, कर्नाटकमधून येणाऱ्या वाहनांना प्रवेश करात (टोल) सवलत देण्याचे जाहीर केले आहे. इतर राज्यांतील वाहनांना मात्र पूर्ण प्रवेश कर भरावा लागणार आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी वार्ताहरांना सांगितले. या निर्णयामुळे कोल्हापुरातून गोव्यात जाणाऱ्या वाहनांना प्रवेश करामध्ये सवलत मिळणार हे आता स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, की महिन्याचे व वर्षांचे पासेस महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील गोव्यालगतच्या जिल्हय़ातील नोंदणी असलेल्या वाहनांसाठी जारी केले जातील. सरकारच्या आदेशानुसार या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या जिल्हय़ांमधील वाहनांना प्रवेश करामध्ये किती सवलत मिळेल, याबाबतची अधिसूचना पुढील आठवडय़ात जारी केली जाईल असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे जिल्हे व कर्नाटकमधील कारवार व बेळगाव या जिल्हय़ांतील वाहनांना प्रवेश करामध्ये सूट मिळणार आहे, ही सूट ते गोवा राज्यात कितीवेळा प्रवेश करतात यावर अवलंबून राहील असे ढवळीकर यांनी सांगितले.
गेल्या एप्रिलमध्ये राज्य सरकारने इतर राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर लागू केला होता, यातून जमा होणारा पैसा हा गोवा राज्यातील रस्ते चांगले करण्याकरिता वापरला जाईल.
पंतप्रधान सडक योजनेत १३९ कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्यात येणार असून, त्यासाठीही मोठा खर्च होणार आहे.