Tomato Price Hike: टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये सुरु असलेल्या उत्पादन तुटवड्यामुळे येत्या काही दिवसात टोमॅटोचे प्रति किलो दर हे २०० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घाऊक बाजारात सोमवारी २५ किलो टोमॅटोच्या खरेदीसाठी तब्बल ४१०० रुपयांची बोली लावण्यात आली होती. याशिवाय भाजी मंडईतील अधिकाऱ्यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च आणि त्यात नफा जोडल्याने २५ किलो टोमॅटोची रिटेल बाजारात किंमत ५००० पर्यंत पोहोचत आहे.
यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, केशोपूर मंडईतील घाऊक विक्रेते सरदार टोनी सिंग यांनी उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील विकास नगर येथे पार पडलेल्या लिलावात ४१०० रुपयात २५ किलो टोमॅटोचा क्रेट विकत घेतला आहे. सिंग सांगतात की, “या वर्षीच्या किमतीने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. या हंगामात टोमॅटोचा लिलाव साधारणपणे १२०० ते १४०० रुपयांपर्यंत होतो. किलो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढ्या मोठ्या किमती पाहिल्या नाहीत.”
यापूर्वी दिल्लीच्या आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न विपणन समिती अर्थात एपीएमसीचे सदस्य अशोक कौशिक यांनी सांगितले होते की, अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही भाव वाढू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
टोमॅटोच्या दरवाढीचा साधारण अंदाज घेतल्यास जूनमध्ये किमती वाढायला सुरुवात झाली. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटो १५० ते १८० रुपये प्रति किलो दरात विकले जात आहेत. याचा परिणाम फक्त जनसामान्यांवरच नाहीतर मोठमोठया फास्ट फूड कंपन्यांवर सुद्धा झाला आहे. मॅक्डोनाल्डने टोमॅटोचे भाव वाढताच आपल्या बर्गर्समधून टोमॅटो काढून टाकणार असल्याचे सांगितले होते तर, काही हॉटेल्समध्ये टोमॅटो सूपची विक्री सुद्धा बंद झाली आहे.
हे ही वाचा<< मॅकडोनाल्ड्सच्या बर्गर व रॅपमध्ये मोठा बदल; सोशल मीडियावर व्हायरल झालं कंपनीचं निवेदन
टोमॅटो दरवाढीनंतर केंद्र सरकारने तब्बल ५०० केंद्रांवरून टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री सुरु केली होती. या केंद्रांवर सुरुवातीला ९० रुपयात टोमॅटो विक्री होत होती तर आता भाव कमी करून ८० रुपयांपर्यंत आणण्यात आले आहेत. दिल्लीतील घाऊक विक्रेत्यांना महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश येथून येणारा टोमॅटोचा पुरवठाच सध्या कमी झाला आहे. महाराष्ट्रातून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोचा पुरवठा वाढू शकतो ज्यामुळे काही प्रमाणात टोमॅटोचे दर खाली येऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रात सुद्धा याच कालावधीत दर कमी होऊ शकतात.
दरम्यान, एकीकडे टोमॅटोचे भाव वधारले असताना आता देशभरात कांदा सुद्धा महाग होत आहे. कांदा निर्यातीच्या प्रश्नामुळे आता टोमॅटोपाठोपाठ कांदा सुद्धा डोळ्यात पाणी आणणार आहे.