महाराष्ट्रासह उत्तर भारतात सध्या उष्णतेचा तीव्र चटका जाणवत आहे. राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. देशात एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना, आग्नेय बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही तासांत या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास कार निकोबारपासून पश्चिमेला १७० किमी अंतरावर दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं आहे. उद्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. १० मे पर्यंत हे चक्रीवादळ वायव्य दिशेनं पुढे सरकणार आहे. त्यानंतर वळण घेऊन हे चक्रीवादळ उत्तर ईशान्य दिशेनं प्रवास करणार आहे. ओडिशा किनारपट्टीपासून या चक्रीवादळाची दिशा वायव्य बंगालच्या उपसागराकडे वळण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली.
या चक्रीवादळाचा ओडिशा किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तयारीबाबत माहिती देताना ओडिशा अग्निशमन सेवा महासंचालक संतोष कुमार उपाध्याय यांनी सांगितलं की, अग्निशमन दलाला चक्रीवादळाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून १७५ पथकं तयार करण्यात आले आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचं संकट लक्षात घेता, अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला काहीही धोका नाही. पण येत्या काही दिवसात महाराष्ट्रात तापमानाचा पारा किंचितसा घटण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.