सध्या अनेक लोकांमध्ये अर्धनिद्रानाश हा झोपेचा नवीन आजार दिसत असून त्याचे कारण ताणतणाव व तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.पूर्ण रात्र झोप जाण्याऐवजी यात झोपेमध्ये काही ठराविक काळात व्यत्यय येत राहतो. विशेष म्हणजे अतिव्यस्त व तणावपूर्ण दिवसांमध्ये आपल्याला हा अनुभव येतो.
भारतीय वंशाच्या निद्रातज्ज्ञाने या अर्धवट निद्रानाशासाठी ‘फिझी स्लीप’ अशी संज्ञा वापरली आहे. लंडनच्या कॅपिओ नाइंटिंगेल हॉस्पिटलमधील निद्रा प्रशिक्षक डॉ.नेरिना रामलखन यांनी सांगितले की, फिझी स्लीप ही वैज्ञानिक संकल्पना नाही, परंतु ज्या लोकांना झोपेत व्यत्यय जाणवतो ते त्या अवस्थेचे वर्णन करतात त्यावरून आपण ही संज्ञा योजली आहे. ते झोपतात पण त्यांना विश्रांती मिळत नाही, यात झोपेतही मेंदू क्रियाशील राहतो. डॉ. नेरिना यांनी या विषयावर ‘टायर्ड बट वायर्ड’ हे पुस्तकही लिहिले आहे. पूर्ण निद्रानाशापेक्षा वेगळी अशी ही अवस्था असून ती तितकीच धोकादायक आहे, असे त्यांनी डेली मेलला सांगितले. यात रूग्णांना प्रत्येक रात्री तीस मिनिटे जाग येते. कधीकधी ते तासभर झोपू शकत नाहीत कारण त्यांचे मन भरकटलेले असते. अर्धनिद्रानाश हा तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे होतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
एकूण ३० हजार रूग्णांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हेच त्याचे कारण आहे. ‘द एनर्जी प्रोजेक्ट’ च्या प्रमुख जीन गोम्स यांनी याबाबत काही प्रयोग केले आहेत. त्यांच्या मते, काही वेळा तुमचा दिवस तणावात जातो पण रात्रीही तुमचे मन काही प्रश्नांवर विचार करीत राहते व तुम्ही दुसऱ्या दिवशी उठता तेव्हा ताजेतवाने असता. आता नवीन तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन शॉपिंग, टीव्ही पाहताना ट्विटिंग, फेसबुक पाहणे असे उद्योग आपण करीत असतो. त्यामुळे मेंदू हा सतत ताणात राहतो, उद्दीपित राहतो. जेव्हा झोपायची वेळ येते त्या वेळी या सवयींमुळे ताण कायम राहतो, असे गोम्स यांचे मत आहे.
झोप येते त्या वेळी तीन गोष्टी घडत असतात; जेव्हा आपण दिव्याचा प्रकाश कमी करतो किंवा अंधार करतो त्या वेळी झोपेसाठी आवश्यक असलेले मेलॅटोनिन हे संप्रेरक स्रवते, आपल्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते, मन व शरीर विश्रांत होऊ लागते, आपली चेतासंस्था हळूहळू विश्रांतीच्या अवस्थेत जाते. दिवसा ते झोपेपर्यंत आपण तंत्रज्ञानाचा जो अतिरेकी वापर करतो त्यामुळे या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही अडथळे येतात.
झोपेत आपण दिवसा जी माहिती मिळवलेली असते, ज्या समस्यांना सामोरे गेलेलो असतो त्यावर मन रात्री प्रक्रिया करीत असते पण आपण जेव्हा तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करतो त्या वेळी ज्यावर प्रक्रिया करायची ती माहिती फार मोठी असते. तुलनेने मेंदूचा माहिती प्रक्रिया करणारा भाग खूप लहान असतो जो त्याला तोंड देऊ शकत नाही, असे रामलखन यांचे म्हणणे आहे.
अर्धनिद्रानाश टाळण्यासाठी काय कराल?
* अर्धनिद्रानाश टाळण्यासाठी दिवसा जेव्हा तुम्ही कोणतेही काम करता तेव्हा ९० मिनिटांनंतर मिनीब्रेक म्हणजे लघुविश्रांती घ्या; त्यामुळे तुमच्या मनाला एक अवकाश लाभेल.
* भरपूर पाणी प्या, त्यामुळे लघुशंकेला तुम्हाला उठणे भाग पडेल व त्यामुळे तरी विश्रांती मिळेल.
* तुमचा फोन बाथरूममध्ये घेऊन जाऊ नका.