वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा रेल्वे प्रवासाचे दर खूपच कमी असल्याचे गाऱ्हाणे मांडत रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर रेल्वे तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रेल्वेच्या जास्त वर्दळ असलेल्या मार्गांवरील जनरल आणि स्लीपर कोचच्या प्रवासाची बसशी तुलना केल्यास दोन्हींच्या तिकीट दरांत खूप मोठी तफावत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्ली ते चंदीगढ या सर्वात कमी प्रवासी भाडे असणाऱ्या मार्गावरील तिकीटाचे दर दैनंदिन वापरातील टुथपेस्टपेक्षाही कमी आहेत. याशिवाय, चेन्नई-कोलकत्ता या १,६६२ किलोमीटरच्या प्रवासासाठीचा तिकीट दर एक किलो चहा पावडरच्या किंमतीइतका आहे. रेल्वे तिकीटांची तुलना होणाऱ्या अशा तब्बल २० गोष्टींची जंत्रीच अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर सादर केली. भारतीय रेल्वेला सध्या प्रवासी सेवेत तब्बल ३२ हजार कोटींची तोटा होत आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, हे धुंडाळण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या या वाढत्या दबावामुळे मे महिन्यातील निवडणुकांनंतर रेल्वेच्या तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toothpaste costs more than train travel rail officials to suresh prabhu %e0%a4%9f