फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९०.७ अब्ज डॉलर आहे. अंबानी हे जगातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत.
HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप १० श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीतील पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे. पूनावाला यांची एकूण संपत्ती २४.३ अब्ज डॉलर्स आहे.
डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात दमानी यांनी जगातील १०० श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले होते. त्यांची एकूण संपत्ती २० अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल १७.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत.
ओपी जिंदल ग्रुपच्या सावित्री जिंदाल या यादीत ७व्या तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९१व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १७.७ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला हे या यादीत ८ व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १६.६ अब्ज डॉलर्स आहे. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते १०९ व्या क्रमांकावर आहे.
सन फार्माचे दिलीप सिंघवी यांची एकूण संपत्ती १५.६ अब्ज आहे आणि ते सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११५ व्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक या यादीत १० व्या स्थानावर आहेत. उदय कोटक यांची एकूण संपत्ती १४.३ अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत उदय कोटक १२९ व्या क्रमांकावर आहे.