बांगलादेशच्या मुक्तियुद्धात नि:शस्त्र नागरिकांवर अनन्वित अत्याचार केल्याप्रकरणी आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्य़ांप्रकरणी जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेच्या नेत्यांना बांगलादेशच्या विशेष लवादाने बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावली.
जमात-ए- इस्लामीचे ९१ वर्षांचे नेते गुलाम आझम यांना ९० वर्षांची शिक्षा ठोठाविल्यानंतर दोन दिवसांनी संघटनेचे सरचिटणीस अली एहसान मोहम्मद मोजाहीद (६५) यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद -२ ने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायमूर्तीच्या त्रिसदस्यीय पीठाचे अध्यक्ष न्या. ओबेदुल हसन यांनी मोजाहीद यांना फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयात आणताना मोजाहीद यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, मात्र फाशीची शिक्षा ठोठावताच त्यांना धक्का बसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
मोजाहीद यांच्यावरील सात आरोपांपैकी पाच आरोप नि:संशय सिद्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या हत्येत वैयक्तिक सहभागाबद्दल दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात येत असल्याचे हसन यांनी स्पष्ट केले.
अल बद्र ही जमातच्या विद्यार्थी संघटनेचा भाग असून मोजाहीद हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. अल बद्रने पाकिस्तानच्या सैन्याच्या इशाऱ्यावरून पद्धतशीरपणे हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुक्तिलढय़ात जे अत्याचार करण्यात आले त्याचे गुन्हेगारी दायित्व मोजाहीद यांच्यावर ठेवण्यात आले आहे.
हिंदू समाजाचा पद्धतशीरपणे नि:पात करण्यात मोजाहीद वैयक्तिक सहभागी होते हा आरोप योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार सिराजुद्दीन होसेन यांची हत्या करण्याचे आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना अत्याचार करण्यास फूस लावण्याचे आदेश मोजाहीद यांनी दिले होते, असे लवादाने म्हटले आहे.
शिक्षा ऐकल्यावर सुरक्षारक्षकांनी मोजाहीद यांना न्यायालयातून बाहेर नेले. इस्लामी चळवळीतील योगदानाबद्दल आपल्याला बळीचा बकरा करण्यात आल्याची ओरड मोजाहीद यांनी या वेळी केली. दरम्यान, मोजाहीद यांच्या शिक्षेच्या निषेधार्थ जमात-ए-इस्लामी संघटनेने गुरुवारी देशव्यापी बंद पुकारला आहे.

Story img Loader