श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. या धुमश्चक्रीत एका मेजरसह लष्कराचे चार जवान आणि एक पोलीस शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. पिंगलन भागातील या चकमकीत मेजर व्ही. एस. धोंडिअल (३३), हवालदार शिवराम (३६) आणि शिपाई हरिसिंग (२६) व अजय कुमार (२७) शहीद झाले, तर चकमकीत सुरक्षा दलाचे नऊ अधिकारी-जवान जखमी झाले. त्यात दक्षिण काश्मीरचे उपपोलीस महासंचालक अमित कुमार यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार चकमकीचे ठिकाण केंद्रीय राखीव पोलीस दला (सीआरपीएफ)च्या ताफ्यावर १४ फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या ठिकाणापासून १२ किलोमीटरवर आहे. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कामरान आहे. तो ‘जैश ए मोहम्मद’चा कमांडर असून पाकिस्तानचा नागरिक आहे. ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव हिलाल अहमद असे आहे. तो स्थानिक असून जैशमध्ये सामील झाला होता, असे सूत्रांनी सांगितले. पिंगलन भागात दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली. ती सुरू असताना दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
J&K Police on #PulwamaEncounter: One more terrorist has been killed in the encounter with security forces. One more security personnel has also lost his life. All three killed terrorists belonged to the Jaish-e-Mohammad. Arms & ammunition recovered from the site of encounter. pic.twitter.com/JE0ASBSowQ
— ANI (@ANI) February 18, 2019
कामरान सूत्रधार?
पिंगलन चकमकीत ठार झालेला कामरान हा दहशतवादी पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारीला झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा सूत्रधार होता, असा संशय आहे. सुरक्षा दलांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.