तालिबानचा वरिष्ठ कमांडर असमतउल्ला शाहीन भित्तानी याच्यासह तीन अतिरेक्यांना अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानातील उत्तर वझिरीस्तान प्रांतात ठार केले.
भित्तानी हा एकेकाळी काश्मिरातही लढला होता. बंदुकधाऱ्यांनी गुलामखान भागातील दर्गा मंडी येथे भित्तानी याच्या वाहनावर गोळीबार केला. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा तो कमांडर होता व त्याच्यासमवेत इतर तीन जणही ठार झाले. भित्तानी याला पकडण्यासाठी १ कोटीचे इनाम लावण्यात आले होते. जे वीस तालिबानी कमांडर्स हवे होते त्यात तो एक होता.  
जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार त्याला पाच वेळा ठार करण्याचा प्रयत्न झाला होता. तालिबानमध्ये येण्यापूर्वी तो हरकत उल मुजाहिद्दीनचा सदस्य होता व जम्मू-काश्मीरमध्ये लढला होता. हल्लेखोर या भागात घबराट पसरवून पसार झाले. स्थानिक रहिवाशांनी त्यांचे मृतदेह जवळच्या रूग्णालयात नेले. कुठल्याही गटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हकीमउल्ला मेहसूद याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केल्यानंतर तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा भित्तानी हा हंगामी प्रमुख होता. तालिबानच्या ‘शुरा’ या कौन्सिलचा तो प्रमुख होता.  तो दक्षिण वझिरीस्तानच्या बेथनी आदिवासी जमातीचा होता.
खैबर पख्तुनवाला प्रांतातील टांक जिल्हा व दक्षिण वझिरीस्तानमधील जंडोला भागात बेथनी आदिवासी राहतात. उत्तर वझिरीस्तानात सात अर्ध स्वायत्त भाग असून तेथे आदिवासी कायदा चालतो. अमेरिका व अफगाणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा भाग तालिबान व अल काईदा यांच्यासाठी नंदनवन मानला जातो.

Story img Loader