न्यूयॉर्क कोर्टाने गुरुवारी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. तर डेमोक्रॅटिक पक्षाने निकालाचे स्वागत केले. खुद्द ट्रम्प यांनी हा खटला म्हणजे आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणण्याचा बायडेन प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप केला.
न्यूयॉर्क कोर्टात ट्रम्प यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सहा आठवडे सुरू होती. त्यामध्ये डॅनियल्ससह २२ जणांनी साक्ष दिली.
निकाल वाचून दाखवला जात असताना ट्रम्प शांत आणि स्तब्ध होते. मात्र, न्यायालयाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा खटला फसवणुकीचा, लांच्छनास्पद होता अशी टीका त्यांनी केली. आपल्या निवडणुकीत समस्या उभ्या करण्यासाठी बायडेन प्रशासनाने हा खटला घडवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. ‘‘या डिस्ट्रिक्ट अॅटर्नींना जॉर्ज सोरोस यांचा पाठिंबा आहे. आम्ही एकही चूक केलेली नाही. मी अतिशय निष्पाप माणूस आहे. मी देशासाठी लढत आहे. मी राज्यघटनेसाठी लढत आहे. आमच्या संपूर्ण देशाची फसवणूक होत आहे’’, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 Phase 7 : निकालाआधी मतदानोत्तर चाचण्यांवर नजरा; अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान
ट्रम्प या निकालाविरोधात अपील करतील अशी दाट शक्यता आहे. या निकालामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्यासमोरील आव्हाने वाढली असली तरी, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या निकालामुळे ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येईल की नाही याबद्दल अमेरिकेत दोन गट पडले आहेत.
ट्रम्प यांच्या खटल्याचा निकाल ११ जुलै रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर चार दिवसांनी विस्कॉन्सिन येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी ट्रम्प यांना पक्षातर्फे औपचारिकपणे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित केले जाईल. अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी अमेरिकेत कोणताही अध्यक्ष किंवा अध्यक्षपदाचा उमेदवार गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेला नाही.
पक्ष ट्रम्प यांच्या पाठीशी
हा निकाल उलटेल असा दावा ट्रम्प यांचे विश्वासू विवेक रामस्वामी यांनी केला. या खटल्यातील प्रॉसिक्युटर हे राजकारणी आहेत. न्यायाधीशांची मुलगी डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित आहे, त्यांनी या खटल्यासाठी निधी उभा केला असा आरोप रामस्वामी यांनी केला. लुईझियानाचे माजी गव्हर्नर बॉबी जिंदाल आणि हाऊस स्पीकर माईक जॉन्सन यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिक्रिया
बायडेन-हॅरिस प्रचारमोहिमेने या निकालाचे स्वागत केले आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे आज न्यूयॉर्कमध्ये आपण पाहिले, अशी प्रतिक्रिया जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या प्रचारप्रमुखांना व्यक्त केली.
खटला अजूनही पूर्ण नाही
ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतरही हा खटला पूर्ण झालेला नाही. त्यांना शिक्षा ११ जुलै रोजी सुनावली जाईल. ते तुरुंगात जातील का मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अनिश्चित आहे. ज्या गुन्ह्यासाठी ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आहे, त्यासाठी कमाल शिक्षा चार वर्षांची आहे. ट्रम्प या निकालाला आव्हान देतील, ती प्रक्रिया देखील दीर्घकाळ चालणारी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना नेहमीच असे वाटते की, त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी कायद्याचा भंग केला तरी त्यांना कधीही परिणामांना सामोरे जावे लागणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना ओव्हल ऑफिसबाहेर ठेवण्याचा एकच मार्ग आहे, मतपेटी. दोषी ठरोत किंवा न ठरोत ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील.– मायकेल टायलर, बायडेन-हॅरिस प्रचारमोहिमेचे प्रमुख