अन्नसुरक्षा विधेयक, भूसंपादन विधेयक, पायाभूत क्षेत्रातील रखडलेल्या प्रकल्पांना तातडीने मंजुरी अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांना हात घालत केंद्र सरकारने आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असतानाच भाजपनेही अंतर्गत मतभेद मिटवून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच यात पुढाकार घेतला आहे.
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी पक्षाचे ढुढ्ढाचार्य लालकृष्ण अडवाणी आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज तितकेसे राजी नाहीत. या पाश्र्वभूमीवर या उभयतांची समजूत काढण्यासाठी रविवारी अडवाणी यांच्या निवासस्थानी संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह हेही उपस्थित होते. या बैठकीत मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याला उभय नेत्यांनी संमती दर्शवल्याचे समजते.
घोषणा ९ सप्टेंबरला?
भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व संघ परिवारातील इतर संघटना यांच्या समन्वय समित्यांची येत्या ८ आणि ९ सप्टेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे.
दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर मोदींचे नाव जाहीर करावे असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे, तर मोदी यांचे नाव आताच जाहीर करण्याचा राजनाथ व अरुण जेटली यांचा आग्रह आहे. परंतु मोदी यांच्या नावाला अडवाणींसह सुषमा स्वराज व मुरली मनोहर जोशी यांचा अडसर आहे. मोदी यांच्या नावाची आताच घोषणा झाली तर मतांचे ध्रुवीकरण होऊन केंद्र सरकारच्या अपयशांकडे डोळेझाक होण्याची भीती मोदीविरोधकांना वाटत आहे.