करोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा – गलवान व्हॅली आणि क्रिकेट…मनोधैर्य उच्च असल्याचं सांगत लष्कराने प्रसिद्ध केले फोटो
रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अॅण्ड मॅथेमॅटिक्स येथे वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते त्यांच्या मॉस्को येथील घरात आराम करत असताना संशयित आरोपी तिथे आला. यावेळी काही घरगुती कारणांवरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा आवळून हत्या केली.
याप्रकरणी मॉस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. २९ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने हत्येची कबुली दिली असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वीसुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती निवदेनाद्वारे देण्यात आली आहे.
हेही वाचा – “मला एका गुप्तचर अधिकाऱ्याने फोन केला आणि…”, राहुल गांधींचा पेगाससबाबत गंभीर आरोप
दरम्यान, स्पुटनिक व्ही लस बनवणाऱ्या १८ वैज्ञानिकांच्या चमूमध्ये बोटीकोव्ह यांचा समावेश होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२१ मध्ये त्यांचा सत्कारही केला होता. करोनावरील लस तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला होता.