सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरण सध्या क्रिकेटविश्वात खूपच गाजत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी क्रिकेटच्या नियमांचा भंग करीत केलेल्या या चुकीच्या कृत्याची जगभरातून टीका होत आहे. ही बाब क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी लाजिरवाणी ठरली आहे. त्यातच आता या प्रकरणावरुन क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांना पैसा पुरवणारी टॉप स्पॉन्सर कंपनी मॅगेलनने गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतची भागिदारी तोडल्याचे जाहीर केले.
Top sponsor Magellan terminates Cricket Australia partnership, reports AFP.
— ANI (@ANI) March 29, 2018
या मोठ्या झटक्याबरोबरच खेळांचे साहित्य बनवणारी कंपनी ASICS या कंपनीने देखील आपण बॉल टेम्परिंग प्रकरणातील खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांच्यासोबतचे करार संपुष्टात आणले आहेत, अशी घोषणा केली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी आजचाही दिवस वाईटच जाणार असल्याचे दिसते.
दरम्यान, ‘सध्या क्रिकेट विश्वात सुरु असलेले बॉल टॅम्परिंगचे प्रकरण आमच्या मुल्यांशी विसंगत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत संबंध तोडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही, असे मॅगेलनचे प्रमुख हमिश डोग्लास यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.