UP Doctor Digital Arrest scam: सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. आता सायबर गुन्हेगारांच्या रडावर सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत. देशभरात या नव्या सायबर घोटाळ्यामुळे हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. उत्तर प्रदेशमधील एसजीपीजीआय या नामांकित महाविद्यालयातील न्यूरोलॉजिस्ट या सायबर घोटाळ्याच्या पीडित ठरल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना सहा दिवस डिजिटल अटकेत ठेवले होते. या सहा दिवसांत त्यांनी महिला डॉक्टरकडून २.८ कोटी रुपये उकळले.

या प्रकरणात आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील ‘संजय गांधी पदव्यूत्तर संस्था (SGPGI) वैद्यकीय विज्ञान’मधील वरीष्ठ महिला डॉक्टरांची फसवणूक झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना पीडिता डॉ. रुचिका टंडन यांनी हा घोटाळा कसा जाला? याची सविस्तर माहिती दिली.

हे वाचा >> विश्लेषण : सायबर गुन्हेगारांचे नवे अस्त्र… ‘डिजिटल अरेस्ट’! काय आहे हा प्रकार? त्यापासून बचाव कसा?

काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’?

‘डिजिटल अरेस्ट’ नावाची युक्ती सायबर गुन्हेगार वापरत आहेत. या गुन्हेगारांची टोळी पीडितांना पोलीस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग, लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करतात. देशविघातक कृत्य, बेकायदेशीर वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगतात. यात पीडित व्यक्तीला २४ तासांपर्यंत त्याच्याच घरात व्हिडीओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते. सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस स्टेशन किंवा सीबीआयसारख्या एजन्सीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात. त्यामुळे पीडित व्यक्तीचा विश्वास बसतो. पीडित व्यक्ती खरेच तिला ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे मानू लागते.

डॉ. रुचिका टंडन यांची फसवणूक कशी झाली?

डॉ. रुचिका टंडन यांना सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून फोन करण्यात आला होता. जेट एअरवेजचे मालक यांच्यासह त्यांचे नाव मनी लाँडरींग प्रकरणात गुंतले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. टंडन यांच्या बँक खात्यात असलेल्या पैशांचा हिशोब करावा लागेल. यासाठी हे पैसे सरकारच्या अकाऊंटमध्ये हस्तांतरीत करण्यास त्यांना सांगितले गेले. खातरजमा झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात पुन्हा वळते करण्यात येतील, असे सांगून सायबर चोरट्यांनी टंडन यांचा विश्वास संपादन केला.

दि. १ ऑगस्ट रोजी डॉ. टंडन यांना ट्राय (TRAI) प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्याकडून पहिला कॉल आला होता. तुमच्या मोबाइल क्रमाकांवर २२ तक्रारी दाखल झाल्या असून लवकरच तुमचा मोबाइल नंबर बंद होईल, असे टंडन यांना सांगतिले गेले. त्यानंतर त्यांना स्कायपे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ज्यामाध्यमातून राहुल नावाचा सीबीआय अधिकारी त्यांच्याशी बोलू लागला.

तोतया सीबीआय अधिकारी राहुलने टंडन यांना सांगितले की, त्यांचे बँक खाते मनी लाँडरींगसाठी वापरण्यात आले आहे. त्या पैशांतून मानवी तस्करी झाली आहे. तसेच तुमच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंग वैगरे आहे. या पुराव्याच्या आधारे तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती डॉ. टंडन यांना दाखविण्यात आली. त्यानंतर त्यांना डिजिटल अटक करण्याचा पर्याय दिला गेला. मात्र या घटनेबद्दल घरातील कुणालाच माहिती द्यायची नाही, अशी अट ठेवली गेली.

प्रत्यक्ष अटक टाळण्यासाठी डॉ. टंडन यांनी डिजिटल अटक म्हणजेच घरातच थांबण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर त्यांनी सायबर चोरट्यांच्या म्हणण्याप्रमाणे ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यातून पहिल्यांदा एक कोटी हस्तांतरीत केले. त्यानंतर पुढच्या काही दिवसात आणखी १.८ कोटींची रक्कम विविध खात्यात वळती केली. मात्र तरीही समोरून वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्यानंतर डॉ. टंडन यांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. तसेच १० ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.