गेल्या पाच वर्षांत परदेशात ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने संसदेत सादर केली आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू कॅनडामध्ये झाले आहेत. हे मृत्यू नैसर्गिक, वैद्यकीय, हिंसक घटना, अशा विविध कारणांमुळे झाल्याचे सरकारने सांगितले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात केरळचे खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारद्वारे ही माहिती सादर करण्यात आली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षात ४१ देशात ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी कॅनडामध्ये सर्वाधिक १७२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत १०८, ब्रिटनमध्ये ५८, ऑस्ट्रेलियात, ५७, रशियात ३७ आणि जर्मनीत २४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शेजारच्या पाकिस्तानमध्येही एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
हेही वाचा – कावड यात्रेच्या मार्गावरील मशीद अन् मजार पांढऱ्या पडद्याने झाकले; पोलीस म्हणाले…
हिंसक घटनांमध्ये १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू
एकूण मृत्यू झालेल्या ६३३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू हिंसक घटनांमध्ये झाला आहे. यापैकी कॅनडात सर्वाधिक ९, त्यानंतर अमेरिकेत ६, तसेच ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, चीन आणि किर्गिस्तानमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू हिंसक घटनांमुळे झाल्याचे सरकारने सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात पुढे म्हटलं की, जेव्हा परदेशात भारतीय विद्यार्थ्यांबरोबर अनुचित प्रकार घडतो, तेव्हा भारत सरकारद्वारे तत्काळ संबंधित देशांशी संपर्क केला जातो आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाते. तसेच एखाद्या ठिकाणी फसलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जेवण, कपडे, औषधी अशा विविध जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न केले जातात. याशिवाय त्यांना भारत सरकारच्या मदत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठीसुद्धा प्रोत्साहित केले जाते.
हेही वाचा – ‘अग्निपथ’ लष्कराचीच, योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधानांची टीका; काँग्रेसचे प्रत्युत्तर
परदेशात सध्या किती भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत?
भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये परदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३.३५ लाख इतकी आहे. खरं तर मागच्या काही वर्षात या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०२२ मध्ये ही संख्या ७ लाख, तर २०२३ मध्ये ९ लाख इतकी होती. मात्र, २०२४ मध्ये ही संख्या वाढून १३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख २७ हजार विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत, तर अमेरिकेत ३ लाख ३७ हजार, ब्रिटनमध्ये १ लाख ८५ हजार, ऑस्ट्रेलियात १ लाख २२ हजार, जर्मनीत ४३ हजार, संयुक्त अरब अमिरातमध्ये २५ हजार तर रशियात २४ हजार ९४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.