अर्जेंटिनामधला एक पर्यटक आग्रा येथील ताज महाल पाहण्यासाठी आला होता. ताज महालाच्या गेटवर त्याची करोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. त्याचा हा अहवाल आल्यापासून हा पर्यटक बेपत्ता झालाय. आता आग्रा पोलीस आणि आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहेत.
अर्जेंटिनाहून आलेला पर्यटक बेपत्ता
अर्जेंटिनाहून आलेल्या पर्यटकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याने त्याचा जो नंबर दिला त्यात १० पेक्षा जास्त अंक होते. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत मात्र त्याचा संपर्क होत नाही. तसंच त्याचं लोकेशन नेमकं काय आहे ते देखील आमच्या लक्षात आलेलं नाही असंही पोलिसांनी सांगितलं. हा पर्यटक दिल्लीत राहतो आहे की आग्रा या ठिकाणीच आहे हेदेखील आम्हाला समजलं नाही. जर हा पर्यटक आम्हाला सापडला तर आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिग करू शकतो असं जिल्हा आरोग्य माहिती अधिकारी अनिल सत्संगी यानी सांगितलं. करोनाचा हा प्रकार कुठला आहे यासाठी तो पर्यटक सापडणं आवश्यक आहे. करोना पॉझिटिव्ह आढळलेला हा पर्यटक आम्हाला सापडला तर त्याला झालेला कोव्हिड कोणत्या प्रकारात मोडतो ते पाहावं लागणार आहे असंही सत्संगी यांनी सांगितलं.
चीन मधून आलेला पर्यटकही करोना पॉझिटिव्ह
काही दिवसांपूर्वी चीनमधून भारतात आलेला एक पर्यटक करोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो किमान कमी लोकांच्या संपर्कात आला होता ही बाब चांगली होती. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्याच्यामुळे ज्या आणखी तिघांना संसर्ग झाला आहे ते तिघे या व्यक्तीच्याच कुटुंबातले आहेत असंही सत्संगी यांनी सांगितलं.
करोनाचा संसर्ग वाढायला सुरूवात झाली आहे त्यामुळे आम्ही महत्त्वाच्या भागांमध्ये चाचण्या वाढवल्या आहेत. आग्रा येथील ताज महाल, लाल किल्ला, मोठी बस स्थानकं आणि रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत अशीही माहिती सत्संगी यांनी दिली.
चीनमधून आग्रा या ठिकाणी आलेला पर्यटकही करोना पॉझिटिव्ह