नवी दिल्ली, पीटीआय
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तिकिटे रद्द करण्याचा सपाटा सुरू आहे. या हल्ल्याचा फटका जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात बसेल, अशी भीती व्यक्त केली जाते. पहलगाम येथील हल्ल्यानंतर काश्मीरमधील ९० टक्के आरक्षणे रद्द झाल्याची माहिती दिल्लीतील पर्यटन व्यावसायिकाने दिली.
तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण सात पटीने वाढले असून, नव्या आरक्षणात ४० टक्के घट झाल्याचे क्सिअर ट्रिपच्या मंजिरी सिंघल यांनी नमूद केले. सध्याच्या कठीण परिस्थितीत आम्ही विमान कंपन्या तसेच हॉटेल चालकांशी संपर्क साधून पर्यटकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यातील आरक्षणेदेखील रद्द झाली आहेत. बहुसंख्य पर्यटक निघून जात आहेत. हल्ल्यानंतर ते येथे थांबणे शक्य नाही. जवळपास ८० टक्के जणांनी आरक्षण रद्द केल्याचे श्रीनगर येथे पर्यटन व्यावसायिक अजिज अली यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत जे चांगले काम झाले होते. त्यावर पाणी फिरले असे ते म्हणाले.
काश्मीरऐवजी नव्या ठिकाणाचा आग्रह
पहलगाम येथील हल्ल्यानंतर काश्मीरमधील ९० टक्के आरक्षणे रद्द झाल्याची माहिती दिल्लीतील पर्यटन व्यावसायिकाने दिली. किमान २५ जणांनी याबाबत सूचना दिल्याचे दिल्लीतील गौरव राठी यांनी सांगितले. काही जणांनी पर्यटनासाठी पर्यायी स्थळ निवडण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. विमान, हॉटेल तसेच बसचे आरक्षण बऱ्यापैकी झाले होते. मात्र हल्ल्यानंतर बेत रद्द करण्याकडे बहुसंख्य जणांचा कल असल्याचे कुशा ट्रॅव्हल्सच्या देव यांनी नमूद केले. या आणि पुढच्या महिन्यातील बहुतेक आरक्षणे रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ काश्मीर नव्हे तर जम्मूलाही जाण्यास नागरिक धास्तावत आहेत. वैष्णोदेवीची आरक्षणेही रद्द करण्यात आली.
काही जणांचे दुष्ट हेतू आहेत. दहशतवाद आणि फुटीरतावादाला ते खतपाणी घालत आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर जम्मू व काश्मीरच्या पर्यटनाचे कमीत कमी नुकसान होईल यासाठी आमचे सारे प्रयत्न सुरू आहेत.- गजेंद्र शेखावत, केंद्रीय पर्यटनमंत्री
पर्यटक निघून जाणे वेदनादायी आहे. ते आमचे पाहुणे आहेत. मात्र लोक का जात आहेत? ते आम्ही समजू शकतो.- ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर