पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी भारताने पर्यटकांना देण्यात येणाऱ्या व्हिसाचे नियम अधिक शिथिल केले आहेत. भारत भेटीवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांना यापूर्वी दोन भेटींमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे.
तथापि, पाकिस्तान, चीन, इराण, इराक, बांगलादेश, अफगाणिस्तान, सुदान आणि पाकिस्तान व बांगलादेशचे मूळ नागरिक असलेल्यांसाठी आणि कोणत्याही देशाशी संबंधित नसलेल्या नागरिकांसाठी यापूर्वी असलेली ६० दिवसांच्या कालावधीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर २००९ मध्ये सदर र्निबध लादण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी डेव्हिड हेडली याने र्निबध नसल्याचा गैरफायदा घेतला आणि तो भारतात नऊ वेळा येऊन गेला आणि त्याने २६/११ रोजी लक्ष्य करण्यात आलेल्या ठिकाणांची केलेली रेकी पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांना पुरविली होती.
दोन पिढय़ांपूर्वी पाकिस्तानशी संबंध असलेल्या नागरिकाने भारतीय व्हिसा मिळविण्यासाठी अर्ज केला तरी भारतीय दूतावासाने त्याबाबत भारत सरकारकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारताच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावेल, असे पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला.