पाकिस्तानातील पंजाब प्रांतात विषारी कफ सिरपच्या सेवनाने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे विषारी औषधाच्या सेवनाच्या बळींची संख्या ४० झाली आहे. या एकाच आठवडय़ात विषारी औषधसेवनामुळे २० बळी गेले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
४० जणांपैकी १८ जण गुजरानवाला येथील तर उर्वरित लाहोरमधील आहेत. अमली पदार्थाचे व्यसन असलेले २० जण गेल्या महिन्यात टायनो कफ सिरप घेतल्याने मृत्युमुखी पडले होते. तर गेल्या आठवडय़ाभरात डेक्स्ट्रोमेथ्रोफॅन या औषधाच्या सेवनाने बळी पडले आहेत, असे पंजाब प्रांताचे आरोग्य सचिव आरीफ नदीम यांनी सांगितले.
पाकिस्तानात विषारी कफ सिरप घेतल्यामुळे झालेले सर्व मृत्यू समान लक्षणे दर्शवीत असून त्या औषधातील काही घटक प्रमाणापेक्षा अधिक असल्याने हे मृत्यू झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज नदीम यांनी वर्तविला. औषधात अतिरिक्त स्वरूपात आढळलेला हा घटक औषध निर्मिती करणाऱ्या पाकिस्तानी कंपन्यांनी भारत आणि चीन या देशांमधून आयात केला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी छापे घालून या विषारी औषधाचे साठे जप्त करण्यात आले असल्याचे, गुजरानवालाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी अश्रफ यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंजाब प्रांतातच सुमारे १५० हृदयरोगी पंजाब इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिऑलॉजीतर्फे दिल्या गेलेल्या कमी प्रतीच्या औषधांचे बळी ठरले होते.