Toyah Cordingley Murder Case Rajwinder Singh Arrested In Delhi: दिल्ली पोलिसांनी राजविंद्र सिंग या ३८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या राजविंद्रला पकडून देणाऱ्याला पाच कोटींचं इनाम ऑस्ट्रेलियामध्ये जाहीर करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील हा वॉन्टेड आरोपी दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. क्विन्सलॅण्डच्या सुमद्रकिनाऱ्यावर २०१८ साली एका २४ वर्षीय तरुणीची हत्या केल्यानंतर राजविंद्र भारतात पळून आला होता. हत्या केल्यानंतर दोन दिवसांमध्येच राजविंद्र भारतात परतला होता. मागील चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होते अखेर दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आलं आहे.
तोह्या कॉर्डिंगले नावाच्या २४ वर्षीय तरुणीची राजविंद्रने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी हत्या केली होती. क्विन्सलॅण्डमधील वँगेटी समुद्रकिनाऱ्यावर तोह्या तिच्या कुत्र्याबरोबर वॉकसाठी आलेली आलेली असताना राजविंद्रने तिच्यावर हल्ला केला. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजविंद्रने पुढील दोन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातून पलायन केलं. विशेष म्हणजे एका रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या राजविंद्रने आपली नोकरी, पत्नी आणि तीन मुलांना ऑस्ट्रेलियात सोडून पळ काढला.
तीन आठवड्यांपूर्वी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी राजविंद्रला शोधून देणाऱ्यास एक मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं (म्हणजेच जवळजवळ ५ कोटी ३० लाख रुपयांचं) बक्षीस जाहीर केलं. कोणत्याही आरोपीसाठी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जाहीर केलेल्या बक्षिसांपैकी हे सर्वात मोठं बक्षिस ठरलं. राजविंद्र हा मुळचा पंजाबमधील अमृतसर येथील बट्टर कालन येथील रहिवाशी आहे. “आम्हाला इतकं ठाऊक आहे की कॅरेन्समधून राजविंद्रने २२ ऑक्टोबर रोजी उड्डाण केलं. म्हणजेच तोह्याच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशीच तो सिडनीला गेला. त्यानंतर २३ तारखेला तो सिडनीवरुन भारताला रवाना झाला. तो भारतात दाखल झाल्याची पक्की माहिती आमच्याकडे आहे,” असं क्विन्सलॅण्ड पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं. आज क्विन्सलॅण्ड पोलिसांनी ट्वीटरवरुन राजविंद्रच्या अटकेची माहिती दिली.
हे बक्षिस जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांमध्येच राजविंद्रला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजविंद्र अमृतसर विमानतळावर आला होता. त्याला कामासंदर्भातील अडचणींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तो आला होता अशी माहिती त्याने आपल्याला दिल्याचं त्याच्या भावाने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं. राजविंद्रने ऑस्ट्रेलियात असा काही गुन्हा केला आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असंही त्याने म्हटलं आहे.
भारत सरकारने यापूर्वीच राजविंद्रला ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांकडे राजविंद्रसंदर्भात ठोस पुरावे असून या पुराव्यांच्या आधारेच आता त्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.