Tariff War Between US, Canada And Mexico : गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक आक्रमक निर्णय घेतले आहेत. यामध्ये कॅनडा आणि मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचाही समावेश आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि मेक्सिकोनेही अमेरिकेवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर टॅरिफ युद्ध सुरू झाले आहे.
शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित चिंता व्यक्त कॅनडा आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्काची घोषणा केली होती. यानंतर आता कॅनडाही १५५ अब्ज कॅनडायन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर २५% शुल्क लादेल असे कॅनडाचे हंगामी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे.
कॅनडाने लादलेल्या या शुल्कामुळे अमेरिकेच्या १५५ अब्ज कॅनेडियन डॉलर्स किमतीच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. पहिल्या टप्प्यातील शुल्काचा परिणाम ३० अब्ज कॅनेडियन डॉलर्सच्या वस्तूंवर होईल आणि ते मंगळवारपासून ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या अंमलबजावणीच्या तारखेलाच लागू केले जातील. उर्वरित १२५ अब्ज कॅनेडियन डॉलर्सचे शुल्क २१ दिवसांच्या आत लागू केले जाईल. ट्रम्प यांनी मेक्सिकन आणि कॅनेडियन निर्यातीवर २५% आणि चीनच्या वस्तूंवर १०% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले. या निर्णयामुळे व्यापार युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याचबरोबर, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनीही त्यांच्या अर्थमंत्र्यांना मेक्सिकन निर्यातीवर अमेरिकेने लादलेल्या मोठ्या शुल्काविरुद्ध नवीन टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ धोरणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेत महागाई वाढणार
अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमधून मोठ्या प्रमाणात तेल आयात करते. अतिरिक्त आयात शुल्क लागू झाल्यानंतर अमेरिकेत पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकते. त्याच वेळी, चीनमधून आयात होणारी इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि इतर ग्राहकोपयोगी वस्तू महाग होतील.
डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले की, “आज मी मेक्सिको व कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर २५% आणि चीनवर अतिरिक्त १०% कर लादला आहे. आपल्याला अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्याची गरज आहे आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रत्येकाची सुरक्षा सुनिश्चित करणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या प्रचार मोहिमेत वचन दिले होते की मी बेकायदेशीर परदेशी नागरिक आणि ड्रग्जना आपल्या सीमेत येण्यापासून रोखेन आणि अमेरिकन लोकांनी त्यासाठीच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे.”