सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत.
घटनास्थळी महापौरांची धाव
घटनेची माहिती मिळताच सूरत महापालिकेचे महापौर दक्षेज मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजपा आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षाच्या नेत्या पायल साकरिया यांच्यासह इतर नेत्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरतमधल्या साचिन भागात सहा मजली इमारत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची भीती आहे. आत्तापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
अग्निशमन दलाने या घटनेबाबत काय म्हटलं आहे?
सूरत अग्निशमन दलाचे अधिकारी बसंत पारीक म्हणाले, आम्ही रात्रभर शोध मोहीम राबवली. दोन महिलांचा आवाज आम्हाला येत होता. त्यानंतर एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर सात जणांचे मृतदेह आत्तापर्यंत आढळले आहेत. आत्तापर्यंत या घटनेत कुणीही बेपत्ता आहे अशी माहिती समोर आलेली नाही. आम्ही तरीही शेजारी असलेल्या इमारतींमध्ये चौकशी करत आहोत.
पोलीस आयुक्त अनुपम गहलोत यांनी काय माहिती दिली?
सूरत पोलीस आयुक्त अनुपम गहलोत म्हणाले, “एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम मदत आणि बचावकार्य करते आहे. इमारतीतल्या पाचव्या क्रमांकाच्या घरात जे लोक होते त्यातले सदस्य हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत सात मृतदेह मिळाले आहेत. एक महिला जिवंत बाहेर आली आहे. ती जखमी असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही घटना नेमकी कशी घडली? इमारत कशी पडली त्याची चौकशी आम्ही करत आहोत.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही सहामजली इमारत २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. ज्यामध्ये ३२ फ्लॅट होते. इमारतीत राहणारे अनेक लोक हे भाडे तत्त्वावर राहात होते. बहुतांश लोक हे मोलमजुरी काम करणारे होते. आता ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकलेत? याची माहिती मिळू शकलेली नाही.