फ्री बेसिक्सच्या माध्यमातून काहीजणांसाठी मोफत इंटरनेट सेवा देण्याचा पुरस्कार करणारा ‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. इंटरनेट वापरासाठीच्या दरांमध्ये फरक नसावा, असे स्पष्ट करत ट्रायने ‘फ्री बेसिक्स’च्या नावाखाली इंटरनेट समानतेच्या तत्त्वाला धक्का देणाऱ्या फेसबुकच्या मनसुब्यांना लगाम घातला आहे. त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली.
इंटरनेट सेवा सर्वासाठी सारखीच; नियामकाकडून फेसबुकचे मनसुबे विफल
ट्रायच्या निर्णयामुळे मी नाराज झालो असलो, तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी आपण पुढील काळातही कार्यरत राहू, असे मार्कने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि जगातील इतर देशांमध्येही जास्तीत जास्त लोकांना इंटरनेटच्या परिघात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फ्री बेसिक्सच्या माध्यमातून आम्ही विविध सेवा देण्याचा प्रयत्न करणार होतो. जोपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न विविध मार्गांनी चालूच राहतील, असेही त्याने स्पष्ट केले.
प्रश्न इंटरनेट समानतेचा आहे..
इंटरनेट सेवा सर्वासाठी सारखीच असावी, ही मागणी केंद्रस्थानी ठेवून नेट न्युट्रॅलिटीच्या पुरस्कर्त्यांनी ‘ट्राय’कडे फेसबुकच्या ‘फ्री बेसिक्स’ व एअरटेलच्या ‘एअरटेल झिरो’ या योजनांविरोधात मोहिम उघडली होती. फेसबुकनेदेखील ही लढाई प्रतिष्ठेची करत जाहिरातींच्या माध्यमातून फेसबुकच्या वापरकर्त्यांना ‘फ्री बेसिक्स’च्या बाजूने कौल देण्याची विनंती केली होती. समान प्रकारच्या सेवांसाठी वेगवेगळे दर आकारले जाऊ नयेत, असे स्पष्ट करणाऱ्या नियमावलीतील तरतुदींबाबत माहिती देताना ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा म्हणाले की, इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना कुठल्याही कारणास्तव अथवा योजनेच्या नावाखाली ग्राहकांना दरांमध्ये तफावत असलेली इंटरनेट सेवा पुरविता येणार नाही. जर एखाद्या सेवेसाठी पैसे आकारण्यात येत असतील अथवा मोफत पुरविण्यात येत असेल, तर ती सर्वच इंटरनेटधारकांना उपलब्ध असायला हवी, असे ट्रायने म्हटले आहे.

Story img Loader