केबलचालकांचा असहकार, ग्राहकांमधील संभ्रम, प्रक्षेपण किमतीवरून उद्भवलेला वाद अशा विविध कारणांमुळे टीव्ही वाहिन्यांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर तूर्त तोडगा काढण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार वाहिन्या निवडण्याची मुदत ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय) आता ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ओनर्स’ (डीपीओ) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे जे ग्राहक नव्या नियमानुसार आपल्या आवडत्या वाहिन्या निवडण्यात असमर्थ ठरले आहेत, त्यांच्यासाठी ट्रायने नवीन ‘बेस्ट फिट प्लॅन‘ जाहीर केला आहे.

मुदतवाढ का?

ट्रायला मिळालेल्या नव्या माहितीनुसार देशात १० कोटी ग्राहक स्थानिक केबलचालकांकडून सेवा घेतात. तर ६७ दशलक्ष ग्राहक डीटीएच सेवा घेतात. आतापर्यंत नव्या आकडेवारीप्रमाणे देशभरात ६५ टक्के घरात स्थानिक केबलचालकांकडून सेवा देण्यात आली आहे. तर ३५ टक्के घरांत डीटीएच द्वारे सेवा लागू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या पाहणीनुसार स्थानिक केबलचालक आणि डीटीएचचालक त्यांच्या ग्राहकांपर्यंत १ फेब्रुवारीपर्यंत या निश्चित वेळेत पोहोचण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळेच ही नवी मुदतवाढ दिल्याचे ‘ट्राय’ने म्हटले आहे.

निवडस्वातंत्र्य कायम..

आतापर्यंत ज्या ग्राहकांनी नव्या नियमानुसार सेवा घेण्यास सुरुवात केली आहे, त्यांना त्याप्रमाणेच या महिन्याची शुल्क आकारणी होणार आहे. परंतु असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत वाहिन्या निवडीच्या स्वातंत्र्यावर बंधन येणार नाही, याची खबरदारी घेण्यासही ‘ट्राय’कडून बजावण्यात आले आहे.

 

‘बेस्ट फिट प्लॅन’ कसा?

कुठल्या वाहिन्या निवडायच्या यामुळे गोंधळात असलेल्या ग्राहकांसाठी बेस्ट फिट प्लान तयार करण्याचे आदेश ट्रायने डीटीएच ऑपरेटर आणि स्थानिक केबलचालकांना दिले आहेत. त्यात ग्राहकांकडून सर्वसाधारणपणे पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचा समावेश असेल. एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या, प्रादेशिक भाषेच्या आणि काही वृत्तवाहिन्या अशा एकत्र वाहिन्यांचे मिळून ‘बेस्ट फिट प्लॅन’ पॅकेज तयार करण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. यामध्ये असलेल्या वाहिन्यांच्या कि मती ट्रायने ठरवून दिल्याप्रमाणेच असणार आहेत.

 

ही मुदवाढ नसून नव्या नियमानुसार ज्या ग्राहकांनी आतापर्यंत वाहिन्यांची निवड केली नाही, त्यांच्यासाठी वाहिन्यांची निवड करणे सोपे जावे यासाठी ‘बेस्ट फिट प्लॅन’ची घोषणा करण्यात आली आहे. ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता ३१ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. नव्या नियमानुसार प्रक्षेपण १ फेब्रुवारीपासून अमलात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाहिन्या निवडीचा काळ वाढविला नाही. –  एस.के.गुप्ता, सचिव ट्राय