देशांतर्गत रोमिंग दरात कपात करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सोमवारी जाहीर केला. मोबाईल सेवा सर्वांसाठी रोमिंग मुक्त करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनाची सध्यातरी पूर्तता करणे शक्य नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. 
नियामक प्राधिकरणाने यापूर्वी २००७ मध्ये रोमिंगमध्ये ग्राहकाने केलेल्या स्थानिक कॉलसाठी प्रतिमिनिट १.४० पैसे तर अन्य शहरांतील कॉलसाठी प्रतिमिनिट २.४० पैसे एवढे शुल्क निश्चित केले होते. त्यामध्ये आता कपात करण्यात आली असून, रोमिंगमध्ये स्थानिक कॉलसाठी प्रतिमिनिट १ रुपया आणि अन्य शहरांतील कॉलसाठी प्रतिमिनिट १.५० पैसे शुल्क करण्यात आले आहे.
काही अटींवर देशांतर्गत मोफत रोमिंग देण्यालाही नियामक प्राधिकरणाने मंजुरी दिली. पुढील महिन्यापासून नवी दर लागू होणार आहेत. मोबाईल सेवा पुरविणाऱया प्रत्येक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मोफत देशांतर्गत रोमिंगचे दोन पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे नियामक प्राधिकरणाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोबाईल ग्राहकांची संख्या आणि मोबाईल वापराचे प्रमाण हे दोन्ही वाढले असल्यामुळे देशांतर्गत रोमिंगचा खर्च कमी झाला असला, तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. ग्राहकांना रोमिंग सुविधा देण्यासाठी मोबाईल कंपन्यांना अजूनही काही प्रमाणात खर्च सोसावा लागतो आहे. त्यामुळे रोमिंग मुक्त मोबाईल सेवा देणे सध्यातरी व्यवहार्य नसल्याचे नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले.

Story img Loader