Three Died in Jaipur railway tragedy : एका किशोरवयीन मुलीचे तिच्या काकांबरोबर मिळून वडीलांना वाचवण्याचे प्रयत्न व्यर्थ गेल्याचा प्रकार जयपूर येथे समोर आला आहे. सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एक व्यक्ती स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करत होता, यादरम्यान त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांचाही जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयपूरच्या सीबीआय गेट क्रॉसिंगच्या जवळ ही घटना घडली.

रविवारी पहाटे घडलेल्या घटनेवेळी सुमित सैन (४०) नावाच्या व्यक्तीने त्याच्या एका नातेवाईकाला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्याने या कॉलदरम्यान रेल्वेचे रूळ देखील दाखवले. पण त्याच्याकडून अधिकची माहिती मिळवण्यापूर्वीच सुमित यांनी कॉल बंद केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यानंतर नातेवाईकाने सुमित यांची मुलगी निशा(१५) हिला आणि त्यांचे मोठे बंधू गणेश सैन (४४) यांना फोन केला. त्या दोघांना सुमित हे रेल्वे क्रॉसिंगजवळ आढळून आले आणि त्यांनी सुमित यांना रेल्वे रुळापासून दूर जाण्यासाठी विनवणी केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच हरिद्वार मेल रेल्वे गाडीने तिघांनाही धडक दिली आणि तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील खो नागोरियान कॉलनीतील कॉलनीतील जय अंबे नगर येथे राहणाऱ्या सुमित यांना नैराश्याचा त्रास होता.

डीसीपी ईस्ट तेजस्वीनी गौतम यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याची मुलगी आणि भाऊ हे रेल्वे रुळावर पोहचले. त्यांनी त्याला रुळावरून उठण्यास सांगितले पण त्याने नकार दिला आणि त्याच दरम्यान एका ट्रेनने त्या तिघांनाही धडक दिली, दुर्दैवाने ते सर्व ठार झाले.”

कुटुंबियांनी तुटलेला मोबईल फोन्स आणि फाटलेले कपडे पाहून त्यांची ओळख पटवली. दरम्यान कुटुंबियांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नाही आणि तो व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असल्याचे सांगितले, असेही डीसीपी म्हणाल्या.