बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातामुळे २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींचा आकडा ९०० वर पोहोचला आहे. शुक्रवारी (२ जून) सायंकाळी सातच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातामुळे ओडिशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यात आज कोणत्याही प्रकारचा राज्य उत्सव साजरा वा कार्यक्रम होणार नसल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
ओडिशा राजाच्या I And PR विभागाने अधिकृत परिपत्रक काढून दुखवट्याची माहिती दिली. तसंच,केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याच क्षणी लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
हेही वाचा >> किंकाळ्या, आरोळ्या आणि मृत्यूचं तांडव! कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक लोक जखमी
ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं की, “या घटनेत ३ रेल्वेंचा अपघात झाला आहे. पहिल्यांदा दुरंतो एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्यानंतर कोरोमंडल मागून येऊन धडकली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे ७ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.”
जखमींवर उपचार सुरु
कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आलं आहे. जखमींना रक्ताची गरज आहे त्यामुळे जखमींसाठी रक्तदान करण्याचंही आवाहन केलं जातं आहे. त्यानंतर जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि भद्रक या ठिकाणी अनेक रक्तदातेही जखमींना रक्त द्यायला आले होते. ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.