Myanmar Earthquake: म्यानमारला २८ मार्च रोजी ७.७ रेश्टर स्केलचा विनाशकारी असा भूंकपाचा धक्का बसला. भूकंपामुळे शेकडो इमारती कोसळल्या. यात आतापर्यंत २९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. अनेक इमारतींचा ढिगारा बाजूला करून त्याखाली जिवंत वाचलेल्या लोकांना सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्यानमारच्या मंडाले येथे एक चमत्कारिक घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली वृद्ध आजीसह दोन अल्पवयीन मुली अडकल्या होत्या. मोबाइलचा वापर करून या मुलींनी आपल्या अखेरच्या क्षणांना कैद केले होते. आपण परत बाहेर जाऊ, याची आशा त्यांनी सोडली होती. मात्र अखेर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आणि त्या बाहेर आल्या.

स्काय न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, १३ आणि १६ वर्षांच्या दोन बहिणी भूकंप आल्यानंतर सहाव्या मजल्यावरील घरातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य इमारतीच्या बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. तेवढ्यात इमारत कोसळल्यामुळे दोघी बहिणी ७५ वर्षांच्या आजीसह ढिगाऱ्याखाली अडकल्या.

मुलींचे वडील इमारतीबाहेर पडण्यात वेळीच यशस्वी झाले. मुली बाहेर पडू शकल्या नाहीत, याबाबत त्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले. मुलींचे मृतदेह तरी ढिगाऱ्याखालून लवकर बाहेर काढावा, अशी विनंती त्यांनी केली. पण त्यांच्या मुली जिवंत होत्या, याची त्यांना कल्पना नव्हती. ढिगाऱ्याखाली अतिशय कोंदट जागेत अडकलेल्या मुलींनी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला. जेणेकरून त्यांचे काही बरेवाईट झाले तरी या व्हिडीओच्या माध्यमातून वडील त्यांना पाहू शकतील.

वडिलांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझ्या मुलींनी व्हिडीओ चित्रीत केला होता. जेणेकरून त्या आणि आजी जर मृत झाल्या. तर कदाचित त्यांचा मोबाइल तरी आम्हाला मिळेल. त्यावरून आम्ही त्यांना पाहू शकतो. त्यामुळे त्यांनी फोनही अनलॉक करून ठेवला होता. जेणेकरून आम्ही तो उघडू शकू.

अनेक तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुली शांतपणे बसून राहिल्या. आजूबाजूला जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यांच्या किंकाळ्या त्यांना ऐकू येत होत्या. त्यांनीही मदतीचा पुकारा केला, पण त्यांना कुणी उत्तर दिले नाही. आजीचा हात पकडून त्या आशेच्या आधारावर बसून होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने ढिगारा काही प्रमाणात बाजूला केला. ज्याठिकाणी मुली अडकल्या होत्या. त्याठिकाणी एक छोटे छिद्र पाडून हवा येण्या जाण्यास जागा मोकळी ठेवली. मात्र फारशी उपकरणे नसल्यामुळे त्यांना ढिगारा हटवता आला नाही.

काही काळाने बचाव पथक पुन्हा परतले आणि त्यांनी दोन मुलींना आणि त्यानंतर आजीला बाहेर काढले. आजीला श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला होता. मात्र वेळीच त्यांना बाहेर काढल्यामुळे त्यांचा प्राण वाचू शकला.