पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना विशेष न्यायालयाकडे नेण्याच्या मार्गावर स्फोटके सापडल्याने त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी १ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मुशर्रफ यांच्याविरुद्धचा खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणे आणि सरकारी वकिलाची नियुक्ती करणे याला मुशर्रफ यांचे वकील अन्वर मन्सूर यांनी हरकत घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असेही मन्सूर म्हणाले. मुशर्रफ यांच्या जिवाला धोका असल्यास त्याबाबत स्वतंत्र याचिका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे सुनावणीस विलंब झाला.
दरम्यान, त्यापूर्वी सकाळी मुशर्रफ यांना ज्या मार्गावरून न्यायालयात नेण्यात येणार होते त्या मार्गावर पाच किलो वजनाचा बॉम्ब आणि गोळ्यांनी भरलेल्या दोन बंदुका मिळाल्या. सुरक्षा रक्षकांकडून मार्गाची तपासणी सुरू असताना पाकिस्तानच्या रेंजर्सना बॉम्ब मिळाला. काळ्या रंगाची दोन पिस्तुले आणि बॉम्ब दूरचित्रवाणी फुटेजमध्ये दिसून आले. तथापि, तो जिवंत बॉम्ब नव्हता.
पंतप्रधानांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय, राजकीय मुत्सद्दय़ांची निवासस्थाने असलेल्या नॅशनल लायब्ररी येथे मुशर्रफ यांच्यावरील खटल्याची सुनावणी होणार असून हा परिसर कडकोट सुरक्षा व्यवस्था असलेला आणि प्रतिबंधित आहे.
देशद्रोहाच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यास मुशर्रफ यांनी घेतलेली हरकत सोमवारी न्यायालयाने फेटाळून लावली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्या. रियाज अहमद खान यांनी मुशर्रफ यांच्या तीन याचिका फेटाळल्या. विशेष न्यायालयाची स्थापना करणे, तीन न्यायमूर्तीची नियुक्ती करणे आणि खटला चालविण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यास मुशर्रफ यांनी हरकत घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा