Travel vlogger Drew Binsky stranded in traffic Mahakumbh Mela 2025 : अमेरिकीतील ट्रॅव्हल व्लॉगर ड्रू बिन्स्की (Drew Binsky) याने कित्येक महिने आधीपासून लहान मोठ्या गोष्टींचे नियोजन करूनही त्याला कुंभमेळ्यात सहभागी होता आलं नाही. याबद्दलचा निराशाजनक अनुभव या व्लॉगरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कुंभमेळ्यासाठी निघालेल्या या व्लॉगरला तब्बल १९ तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागल्याचेही त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाकुंभमेळा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा माणसांचा मेळावा असतो, यामध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जगभरातील लाखो लोक एकत्र येऊन पवित्र संगमात स्नान करतात. गेल्या वर्ष भरापासून ड्रू या प्रवासाचे नियोजन करत होता. पण प्रवासादरम्यान तो भीषण वाहतूक कोंडीत अडकला आणि त्याला कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत

“कधीकधी प्रवास करणे वाईट अनुभव असतो. आज मी कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकलो नाही – मानवी इतिहासातील सर्वात मोठा मेळावा जिथे ४०० दशलक्ष लोक उत्तर भारतातील पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात,” असे त्याने आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ड्रूने त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. अडवलेले रस्ते , तपासणी नाके, बॅरिकेड्स इतकंच नाही तर दाट धुके यामध्ये तयार झालेल्या परिस्थितीत प्रयागराजच्या जवळ पोहचणे अशक्य वाटू लागल्याचे त्याने सांगितले. त्याला प्रयागराज शहरापासून अवघे २१ किलोमीटर दूर पर्यंत पोहचणे शक्य झाले.

अखेर प्रवासाचे दुसरे माध्यम उपलब्ध नसल्याने त्याने प्रवासाचा शेवटचा टप्पा चालत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्याकडे असलेल्या बॅगा आणि कडाक्याची थंडी यामुळे त्याने हा विचार सोडून दिला. त्याने त्याच्या चालकाबरोबर ती रात्र गाडीतच घालवली.

“२०१७ पासून मी १,२०० हून अधिक व्हिडीओ बनवले आहेत आणि हा पहिला व्हिडीओ आहे ज्यामध्ये मी स्टोरी शूट करण्यात अयशस्वी ठरलो. आणि हे चुकवल्याचे मला दु:ख होत आहे कारण पुढच्या वेळी ही घटना होईल ती आजपासून १४४ वर्षींनी”, असे ड्रू त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. नंतर त्याने आपण विश्रांती घेण्यासाठी बेरूतला जाणार असल्याचेही त्याने नमूद केले. या पोस्टच्या अखेरीस त्याने “भारत एक, बिन्स्की शून्य” असंही म्हटलं आहे.

दरम्यान बिन्स्की याची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून लोक त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel vlogger drew binsky stranded in traffic for 19 hours misses mahakumbh mela insta post goes viral rak