हुगळी जिल्ह्य़ातील जलपिया येथे शनिवारी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तृणमूलच्या या कार्यकर्त्यांचे नाव मोहम्मद अख्तर (५२) असे असून ते सकाळी बाजारात जात असताना लक्ष्मण चौधरी (४०) याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. चौधरी याला अटक करण्यात आली  आहे, असे पोलीस अधीक्षक प्रवीण त्रिपाठी यांनी सांगितले. अख्तरच्या कुटुंबीयांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे.

 

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मोटारीत बॉम्ब

मालदा: निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका मोटारीत शनिवारी चार बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे. वाहनचालक मोटार सुरू करणार इतक्यातच बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले.

वाहनचालकाला मोटारीतील आसनाखाली एक बॅग दिसली, त्यामध्ये काहीतरी ठेवल्याचेही चालकाने पाहिले. सदर मोटार एका शाळेच्या आवारात उभी करण्यात आली होती. त्या मोटारीतून निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवारी होणाऱ्या मतदानासाठी नेण्यात येणार होते. आसनाखाली बॅग असल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच त्याने ही बाब ओरडून निदर्शनास आणली असता तेथे लोक गोळा झाले. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी ती बॅग तेथून हलविली.

 

केरळमध्ये आदिवासी प्रमुख ‘निवडणूक सदिच्छादूत’

तिरुअनंतपूरम: आदिवासी समाजामध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी या समाजातील प्रमुखांना निवडणूक सदिच्छादूत म्हणून सहभागी करून घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. येत्या १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आदिवासींच्या सात प्रमुखांशी संपर्क साधला आहे, स्थानिक भाषेत या प्रमुखांना कनी मूप्पन असे संबोधले जाते. आदिवासी समाजातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी बी. प्रभाकर यांनी यासाठी एका मोहीम हाती घेतली आहे. आदिवासी समाजातील जनतेला मतदान करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.