भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. १८ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसने मात्र गंभीर आरोप केला आहे. पक्षात प्रवेश केला नसल्यानेच भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं आहे की “भाजपाने गतवर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगवली होती”. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलं हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कधीही सौरव गांगुलीला पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचं भाजपाने सांगितलं आहे.
बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष?; जय शहा पुन्हा सचिवपदी; राजीव शुक्ला उपाध्यक्ष
गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे ३६वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. जय शाह यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंडळातही गांगुलीऐवजी शाह ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
“सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याचा संदेश भाजपा राज्यात देऊ इच्छित होती. आम्ही याप्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. पण भाजपाने निवडणुकीच्या आधी आणि नंतरही अशा प्रकारचा प्रचार केला असल्याने त्यावर उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. भाजपा गांगुलीचा अपमान करु इच्छित असल्याचं दिसत आहे,” असं कुणाल घोष यांनी सांगितलं आहे.
विश्लेषण : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष? गांगुलीची फेरनिवड का नाही?
अमित शाह यांचा उल्लेख करताना तृणमूल काँग्रेसचे राज्यातील सरचिटणीस यांनी दावा केला आहे की “भाजपाचे वरिष्ठ नेते मे महिन्यात सौरव गांगुलीच्या घरी जेवण्यासाठी गेले होते”. याबद्दल सौरव गांगुलीच योग्य स्पष्टीकरण देऊ शकतो. जर त्याच्याकडे काही राजकीय कारणं असतील तर तो कितपर्यंत त्याबद्दल सांगू शकतो याबद्दल मला शंका आहे असंही घोष म्हणाले आहेत.
सौरव गांगुलीला पाठिंबा देताना तृणमूलचे खासदार शंतनू सेन यांनी त्याला कार्यकाळ वाढवून का दिला नाही अशी विचारणा केली आहे. भाजपाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. हे मगरीचे अश्रू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तृणमूलचे उगाच राजकारण करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
गांगुलीकडून ‘आयपीएल’ अध्यक्षपदासाठी नकार
‘बीसीसीआय’चा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा हे पद भूषवण्यासाठी उत्सुक होता. मात्र गेल्या आठवडय़ात दिल्ली येथे झालेल्या बैठकांमध्ये गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच ‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ भूषवण्याची प्रथा नसल्याचेही गांगुलीला सांगण्यात आले. गांगुलीला ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्याबाबत विचारणा झाली होती, पण त्याने हे पद स्वीकारण्यास नकार दिला. ‘‘सौरवने ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्यास नम्रपणे नकार दिला. ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवल्यानंतर याच संस्थेतील एका उपसमितीचे अध्यक्ष म्हणून काम करणे योग्य नसल्याचे गांगुलीचे म्हणणे आहे. त्याची पुन्हा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा होती,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.