पीटीआय, कोलकाता, मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील शालेय नोकरभरतीमध्ये लाच घेऊन नियुक्त्या केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वषण विभागाने (सीबीआय) सोमवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीबन कृष्ण सहा यांना त्यांच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निवासस्थानातून अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सहा हे बुरवान विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांची याप्रकरणी सीबीआयकडून १४ एप्रिलपासून चौकशी सुरू आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांतील नोकरभरतीत हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सहा यांना कोलकात्यामधील निझाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना सायंकाळी अलिपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. घोटाळय़ाशी संबंधित अनेक कागदपत्रे सहा यांच्या घरातून हस्तगत करण्यात आली. या कटातील अन्य व्यक्तींच्या सहभागाबाबत सहा यांची चौकशी करण्याची गरज आहे. त्यांनी घरातील शोधमोहिमेदरम्यान आपले दोन भ्रमणध्वनी दूर तलावात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सीबीआयतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आला.