Trinamool Congress mp Abhishek Banerjee on Pahalgam Attack :जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी पाकिस्तानला धडा शिकवण्याची तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग परत घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

“पाकिस्तानवर आणखी सर्जिकल स्ट्राईक किंवा प्रतीकात्मक इशारा देण्याची ही वेळ नाही. ही वेळ त्यांना कळेल अशा भाषेत धडा शिकवण्याची आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्याची वेळ आली आहे,” असे टीएमसी खासदार बॅनर्जी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. तसेच बॅनर्जी यांनी पक्ष राजकारणाचा विचार सोडून या मुद्द्यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे असेही बॅनर्जी यावेळी म्हणाले आहेत.

“गेल्या काही दिवसांपासून आपण मुख्य प्रवाहातील माध्यमांचे आणि केंद्र सरकारमधील लोकांचे वर्तन आपण बारकाईने पाहत आहोत, या पूर्वी कधीही न घडलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत त्रुटींचा सखोल तपास करण्याऐवजी ते एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल अशा गोष्टी सांगण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत.”

“अशा क्षुल्लक राजकारणापासून राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नावर एकदाच कायमचा तोडगा काढण्याची वेळ आली आहे,” असेही बॅनर्जी यावेळी म्हणाले आहेत.

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या २६ जणांचा मृत्यू झाला आहे, यापैकी बहुतांश जण हे पर्यटक होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील दहशतवाद्यांना आणि कटात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा सांगितले आहे. तसेच मोदींनी पीडितांना न्याय मिळेल असे म्हटले आहे. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतीयांची एकता ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे.