तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाने गुरुवारी गंभीर वळण घेतलं असून महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभेच्या आचार समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. संबंधित प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी दावा केला की, महुआ मोईत्रा यांनी त्यांचं संसदेचं लॉगइन आयडी आणि पासवर्ड त्यांना प्रदान केलं आहे. या लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून ते स्वत: आवश्यकतेनुसार मोईत्रा यांच्या वतीने थेट लोकसभेत प्रश्न उपस्थित करू शकत होते.
खासदार महुआ मोईत्रा यांनी हे पत्र हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. संबंधित पत्राचा मसुदा (ड्राफ्ट) पंतप्रधान कार्यालयाने पाठवला असून त्यावर दर्शन हिरानंदानी यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचं मोईत्रा यांनी म्हटलं आहे.
गुरुवारी लोकसभेच्या आचार समितीला सादर केलेल्या तीन पानी प्रतिज्ञापत्रात आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी म्हणाले,”पंतप्रधान मोदींना अडचणीत आणण्यासाठी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर हल्लाबोल करणं, हा एकमेव मार्ग आहे असे मोईत्रा यांना वाटलं होतं. कारण गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी हे एकाच राज्यातील आहेत.”
हेही वाचा- संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोहुआ मोईत्रा लाच घेतात, भाजपाच्या निशिकांत दुबे यांचा गंभीर आरोप!
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दोन पत्रे लिहिल्यानंतर काही दिवसांनी हिरानंदानी यांनी हे प्रतिज्ञापत्र जारी केलं. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात महुआ मोइत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मोईत्रा यांनी हिरानंदानी समूहाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला. तर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित प्रकरणाची तांत्रिक चौकशी करावी, अशी विनंती केली.
हिरानंदानी यांनी गुरुवारी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं, “महुआ मोईत्रा यांनी अदाणी समूहाला लक्ष्य करून सरकारला अडचणीत आणतील, असे काही प्रश्न तयार केले होते. जे प्रश्न त्या संसदेत उपस्थित करू शकतील. त्यांनी संसद सदस्य म्हणून त्यांचा ईमेल आयडी मला दिला होता. जेणेकरून मी त्यांना माहिती पाठवू शकेन आणि त्या थेट संसदेत प्रश्न मांडू शकतील.”
हेही वाचा- “पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, अन्…”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा टोला
“याशिवाय महुआ मोईत्रा यांनी मला अदाणी समूहावरील हल्ल्यांमध्ये पाठिंबा देत राहण्याची विनंती केली आणि त्यांनी मला संसदेचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्रदान केला, जेणेकरून आवश्यक असेल तेव्हा मी थेट त्यांच्या वतीने प्रश्न पोस्ट करू शकेन,” असंही दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.
हेही वाचा- “काँग्रेस सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू”, निवडणुकीआधी राहुल गांधींचं जनतेला आश्वासन
गुरुवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करत मोईत्रा म्हणाल्या, “दर्शन हिरानंदानी यांना त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. उद्योगविश्वातून त्यांना संपवलं जाईल, अशी धमकी आली. त्यांच्या कंपन्यांवर सीबीआय छापे टाकेल आणि सर्व सरकारी व्यवसाय बंद केले जातील. तसेच सर्व PSU बँक वित्तपुरवठा ताबडतोब बंद केला जाईल, अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.”
“तीन दिवसांपूर्वी (१६ ऑक्टोबर) हिरानंदानी ग्रुपने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. आज (गुरुवारी) एक प्रतिज्ञापत्र प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाले. हे प्रतिज्ञापत्र लेटरहेड नसलेल्या एका पांढर्या कागदावर आहे,” असंही मोईत्रा यांनी निदर्शनास आणून दिले.