ऐतिहासिक बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत काँग्रेस नव्हे तर तृणमूल काँग्रेसने जेरीस आणले आहे. रेल्वे अर्थसंकल्प सादर होत असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे सदस्य शांत बसून होते; तर तृणमूलचे सदस्य मोदी सरकारला टोमणा मारण्याची एकही संधी सोडत नव्हते. प्रश्नोत्तराच्या तासाला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येवर प्रश्न विचारणाऱ्या निशिकांत दुबे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत तृणमूलच्या सुगत रॉय व कल्याण बॅनर्जी यांनी हल्ला चढवला. ..तुम्ही जातीयवादी आहात, तुम्हीच बाबरी मशीद पाडली.. अशा घणाघाती शब्दांत तृणमूल सदस्यांनी भाजपला हिणवले.
दिल्ली म्हणजे गोध्रा नव्हे. हा देश धर्मनिरपेक्ष आहे. जातीयवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम कल्याण बॅनर्जी यांनी मोदी सरकारला दिला. विरोधी पक्षनेतेपदासाठी सरकारपुढे हतबल झाल्याने काँग्रेसच्या विरोधाला धार राहिलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे सदस्य मात्र सभागृह डोक्यावर घेत आहेत. महागाईच्या मुद्दय़ावर सत्ताधाऱ्यांना तृणमूल सदस्यांनी जेरीस आणले आहे. महागाईवरून सरकारविरोधी घोषणा देणाऱ्या काँग्रेस सदस्यांना, तुमची अवस्था खूपच वाईट झाली आहे, असे भाजप सदस्यांनी सुनावल्यावर तृणमूल काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले. तृणमूलचे सुगत रॉय भाजपला उद्देशून म्हणाले, काळजी करू नका. तुमची अवस्था यापेक्षाही वाईट होणार आहे. कल्याण बॅनर्जी यांनी तर भाजपला जातीयवादी ठरवले. गुजरातमध्ये गोध्रा होऊ शकते, पण विसरू नका ही दिल्ली आहे. हा देश धर्मनिरपेक्ष आहे, अशी सरबत्ती बॅनर्जी यांनी सुरू केली. निशिकांत दुबे बांगलादेशी घुसखोरांवर प्रश्न विचारत असताना बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला. दुबे यांना प्रश्न विचारू द्या, अशी सूचना करणाऱ्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावरदेखील बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. महाजन यांना उद्देशून बॅनर्जी म्हणाले की, तुम्ही लोकसभा अध्यक्षा आहात. अशा रीतीने कुणा एका पक्षाचे समर्थन करू नका. तृणमूलकडून केवळ कल्याण बॅनर्जी व सुगत रॉय हेच घोषणाबाजी करीत होते. अवघे ४४ सदस्यांसह काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची जबाबदारी आपसूक त्यांच्याकडे आली आहे, परंतु त्यांच्याऐवजी तृणमूल काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत आहे. त्याउलट निवडणुकीत मोदी लाट रोखून धरणारे अण्णाद्रमुक पक्षाचे सदस्य सभागृहात कार्यसंचालनात सहकार्य करीत होते.
तृणमूल-भाजप संघर्ष
लोकसभेत भोजनाच्या सुट्टीनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य हातघाईवर आले होते. हाणामारी होण्याचा प्रसंगच आला होता. रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली तसेच पश्चिम बंगालकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. या गोंधळात तीन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. तृणमूलच्या सदस्यांनी पंतप्रधान तसेच रेल्वेमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले. तृणमूलच्या सौगथा रॉय यांनी भाजपचे हरि नारायण राजबर यांनी तृणमूल काँग्रेसच्या महिला सदस्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्याला भाजपने आक्षेप घेतला. त्यानंतर तृणमूल सदस्यांनी संसद परिसरात महात्मा गांधी या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.