ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदू पक्षकारांना वाराणसी न्यायालयाने प्रार्थना करण्याचा अधिकार बहाल केला. या निर्णयाला आता एक आठवडा झाल्यानंतर मुस्लीम समुदायाकडून याचा विरोध केला जात आहे. कालच उत्तर प्रदेशमधील बरेली येते मौलाना तौकिर रजा यांनी या निर्णयाविरोधात जेल भरो आंदोलन पुकारले होते. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे नेते सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. योगी आदित्यनाथ जर बंगालमध्ये आले तर आम्ही त्यांना घेराव घालू. तसेच हिंदू बांधवांनी ज्ञानवापी मशिदीवरील ताबा सोडून द्यावा, असेही आवाहन चौधरी यांनी केले.
जमीयत उलेमा-ए-हिंदचे पश्चिम बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कोलकोता येथे मोर्चा काढण्यात आला. ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंनी पूजा करण्यास विरोध असल्याचे या मोर्चाद्वारे सांगण्यात आले. चौधरी म्हणाले की, योगी आदित्यनाथ कोणता निर्णय घेतायत, याची त्यांनी कल्पना नाही. जर ते आज बंगालमध्ये कुठेही असते तर आम्ही त्यांना बाहेर जाऊ दिलं नसतं, असा धमकीवजा इशारा चौधरी यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
Video : ज्ञानवापी प्रकरणी ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक; मौलवी तौकीर रजा यांच्या अटकेच्या विरोधात निदर्शन
ज्ञानवापीत बळजबरीने ते लोक (हिंदू भाविक) घुसले असून तिथे पूजाअर्चा सुरू केली आहे. त्यांनी तात्काळ मशिदीचा ताबा सोडावा, अशीही मागणी चौधरी यांनी केली. “आम्ही कधी कोणत्या मंदिरात नमाजसाठी जातो का? मग ते लोक आमच्या मशिदीत का आले? मशीद ही मशीद असते. जर कुणी मशिदीला मंदिरात परावर्तित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही”, अशी भूमिका चौधरी यांनी व्यक्त केली.
वाराणसी न्यायालयाने दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना – पूजा करण्याचा अधिकार बहाल केला. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तेखाना) मध्ये पूजा करू शकतात. सध्या मशिदीतील हा भाग बंद ठेवला गेलेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवसांत हिंदूंना त्याठिकाणी पूजाअर्चा करण्याची व्यवस्था करून द्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
ज्ञानवापीच्या ‘व्यासजी तळघरा’त ३१ वर्षांनी पूजा आणि आरती, आयुक्तांचीही उपस्थिती
न्यायालयाच्या या आदेशानंतर वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीत १ फेब्रुवारी रोजी ३१ वर्षांनी पूजा करण्यात आली. याविरोधात आता मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या घटनेवर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत असताना समजावादी पक्ष आणि आरजेडी वगळता काँग्रेससह इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षांनी धारण केलेलं मौन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.