नवी दिल्ली : तणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्याच्या मुद्दय़ावरून मंगळवारी सभागृहात नाटय़ रंगले. ओब्रायन यांनी सभागृहातून निघून जावे, असा आदेश सभापती जगदीप धनखड यांनी आधी दिला, पण नंतर सभापती म्हणाले की, ओब्रायन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा मताला टाकला नसल्याने ते कामकाजात सहभागी होऊ शकतात.
धनखड यांनी सांगितले की, ओब्रायन यांच्या निलंबनाच्या ठरावावर मतदान न घेण्याचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे, पण त्याचा उपयोग होत नाही. त्यानंतर ओब्रायन सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रमोद तिवारींसह अनेक सदस्यांनी ओब्रायन यांच्याबाबत मवाळ भूमिका घेण्याची विनंती सभातपतींना केली होती. पण, मी तसे का करावे, असा प्रतिप्रश्न धनखड यांनी केला होता.
राज्यसभेतील बेशिस्त वर्तन आणि सभापतींच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ओब्रायन यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहनेते पियूष गोयल यांनी मांडला होता. राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधकांनी मणिपूरच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, हे बघून शक्य झाल्यास दुपारी चर्चा सुरू करता येईल, असे सांगितले. त्याच वेळी डेरेक ओब्रायन यांनी आक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोलण्याची परवानगी मागितली. ओब्रायन यांनी आक्षेपाचा मुद्दा उपस्थित न केल्याने संतापलेल्या धनखड यांनी ओब्रायन यांना कठोर शब्दांत समज दिली होती.