बुधवारी (१३ डिसेंबर) दोन तरुणांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात शिरून सुरक्षाभंग केला आहे. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रकरणावर संसदेच्या सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी विरोधीपक्षाच्या खासदारांकडून करण्यात आली. यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.
गुरुवारी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरात विरोधीपक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षाभंगावर चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली. सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी खासदारांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची मागणी केली. यासाठी २८ नोटिसा पाठवल्या. पण राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी संबंधित नोटीस नाकारली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या समोरील बाजूस येत गदारोळ केला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी उत्तर द्यावं, अशी मागणी केली.
यानंतर राज्यसभा अध्यक्ष धनखड यांनी खासदारांच्या वर्तनाचा निषेध केला आणि त्यांचं वर्तन संसदेच्या नियमांचं उल्लंघन करते, असं म्हटलं. यावेळी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभा अध्यक्षांच्या खुर्चीसमोरील भागात जात हातवारे करत युक्तिवाद केला. या प्रकारामुळे संतापलेल्या धनखड यांनी डेरेक ओब्रायन यांचं नाव घेत त्यांना निलंबित केलं.