१३ वर्षांतील उच्चांकी पातळी
भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे.
दोन वर्षांच्या घसरणीच्या प्रवाहाच्या विपरीत २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकांतील एकूण निधीने मागील १३ वर्षांतील सर्वोच्च स्तर गाठला आहे. २०१९च्या अखेरीस ८९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६,६२५ कोटी रुपये) असणाऱ्यां निधीत वर्षभराच्या कालावधीत तिपटीहून मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी २००६ मध्ये भारतीयांच्या निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र त्याला उतरती कळा लागली होती. रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारतीयांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असली, तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र घसरत आला आहे.