सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाक खटल्यात बुधवारी न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद यांची अमायकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती करण्याला मान्यता दिली. येत्या ११ मेपासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची कायदेशीर वैधता ठरविण्यासाठी रोज सुनावणी घेण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या खटल्याच्या कामकाजाला गती देण्यासाठी सदर प्रकरण न्यायमूर्तींच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपूर्द केले होते. यावेळी न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या याचिकेवर उन्हाळी सुट्टीतही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच समान नागरी कायद्याच्या वादात न पडता या प्रकरणाचा विचार करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका, असे आवाहन मुस्लिम समाजाला केले होते. याच समाजातील विचारवंत मंडळी या प्रथेच्या निर्मूलनासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. बाराव्या शतकात अनिष्ठ प्रथांविरोधात बसवेश्वर यांनी केलेल्या सुधारणा चळवळीचा संदर्भ देत मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या पुन्हा लक्ष वेधले होते. तिहेरी तलाकच्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. पुढे या आणि त्यावर तोडगा काढा. हा तोडगा उत्तमच असेल आणि पुढील अनेक पिढय़ा त्याबद्दल तुमची आठवण काढतील. समाजातूनच काही शक्तीशाली लोक पुढे येतील आणि कालबाह्य़ झालेल्या या प्रथेचे उच्चाटन करतील. आमच्या मुस्लीम भगिनी आणि मातांची तिहेरी तलाकच्या तडाख्यातून सुटका करण्याची जबाबदारी समाजातील विचारवंत स्वीकारतील याची आपल्याला खात्री आहे. भारतातील मुस्लिमांनी केवळ देशातील मुस्लिमांनाच नव्हे तर जगातील मुस्लिमांना आधुनिकतेचा मार्ग दाखवावा, असे आवाहनही मोदी यांनी केले होते.

Story img Loader