त्रिपुरामधील खोवई जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण राज्यामध्ये आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये एका छोट्या मुलानेच आपल्या आईने केलेल्या भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याबद्दल खुलासा केलाय. आरोपी महिलेच्या मुलाने आईविरोधात जबाब नोंदवताना धक्कादायक घटनाक्रम सांगितलाय. आईने माझ्या वडिलांचं शीर कापलं आणि ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं. त्यानंतर आईने ही रक्त गळत असणारी पिशवी घरातील देवघरासमोर ठेवल्याचा दावा या मुलाने पोलिसासंमोर केलाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केलाय असं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
घटनेची माहिती देतना पोलिसांनी हा घटनाक्रम आज (१२ मार्च २०२२ रोजी) सकाळी घडल्याचं म्हटलंय. खोवई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भूपेंद्र चक्रवरती यांनी आरोपी महिलेच्या मोठ्या मुलाने जबाब नोंदवताना गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितलाय. मरण पावलेल्या व्यक्तीचं वय ५० वर्ष इतकं होतं. मात्र या महिलेने इतक्या क्रूरपणे आपल्या पतीची हत्या का केली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मुलाने दिलेल्या माहितीनुसार मागील काही काळापासून त्याच्या आईची मानसिक परिस्थिती ठीक नव्हती. ही महिला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारही घेत होती असं तिच्या मुलाने सांगितलंय.
महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ती शाकाहारी आहे. मात्र आज सकाळी हा सर्व प्रकार घडला त्यापूर्वीच्या रात्री म्हणजे शुक्रवारी रात्री तिने मांसाहारी जेवण केलं होतं. “आईने रात्री जेवणात चिकन खाल्लं,” असं या मुलाने पोलिसांना सांगितलंय. “जेवणानंतर आम्ही सर्वजण झोपायला गेलो. मात्र रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या वडिलांचं शीर हे धडापासून वेगळं करण्यात आल्याचं मला दिसलं. माझी आई हातामध्ये एक धारधार शस्त्र पकडून उभी होती. हे शस्त्र पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं,” असंही या मुलाने पोलिसांना सांगितलं. समोरच्या प्रकार पाहून या मुलाने आरडाओरड केला तेव्हा त्याची आई पतीचं कापलेलं शीर हातात पकडून खोलीबाहेर गेली आणि तिने ते शीर घरातील देव्हाऱ्यासमोर ठेवलं, असं जबाबात सांगण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने नंतर स्वत:ला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं. यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश करत या महिलेला अटक केली. घरामध्ये शीर नसलेला मृतदेह आम्हाला आढळून आला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसेच या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.