नरेंद्र मोदी यांच्या आगामी जम्मू-काश्मिर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी शुक्रवारी भारतीय लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले. यामध्ये स्थानिक पोलिसांच्या तीन जवानांचाही समावेश आहे. तर, लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. आज पहाटे तीनच्या सुमारास उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.  
अजूनही या ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू असून भारतीय लष्कराकडून मोठ्या ताफ्यासह शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या उरी येथील सहा विधानसभा मतदार संघांमध्ये चार दिवसांनी मतदान होणार आहे. आणि त्याआधीच दहशतवाद्यांनी या परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बारामुल्ला जिल्ह्यातील उरीजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. घुसखोरी झाल्याचे लक्षात आल्यावर दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. सुरूवातीला झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान आणि गोळीबारीचा आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला. तर लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराचे अधिकारी अब्दुल गणी मिर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.  त्यानंतर लष्कराकडून सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करत ग्रेनेडचाही मारा करण्यास सुरूवात केली. या चकमकीमध्ये आतापर्यंत एका लष्कर अधिकाऱयासह एकूण ११ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांची नेमकी संख्या अद्याप कळू शकली नसली तरी संपूर्ण परिसरात लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.

Story img Loader