एपी, नाहा (जपान)

जपानच्या मुख्य बेटांवर शुक्रवारी उष्णकटिबंधीय वादळ मावर धडकले. या वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. यामुळे जपानच्या दक्षिण आणि पश्चिम प्रांतात पुराचा आणि दलदलीचा धोका निर्माण झाला. शनिवार सकाळपासून २४ तासांत ३५ सेंटीमीटर (सुमारे १. १ फूट) पावसाच्या अंदाजासह पश्चिम आणि मध्य जपानच्या काही भागांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला होता.

जपानच्या पश्चिमेकडील वाकायामा, कोची आणि मध्य जपानमधील नागानो यासह पुराचा धोका असलेल्या सखल भागांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. येथे पूर आणि भूस्खलनाचा धोका आहे. येथील रहिवाशांना मदत आणि निवारा केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या संदर्भातील वाहिन्यांच्या चित्रफितीत वाकायामा शहरातील निवासी क्षेत्रात रस्त्यांवरून मोठे जलप्रवाह दिसत होते. टोक्योत रस्त्यांवर सोसाटय़ाच्या वाऱ्याने काही झाडांच्या फांद्या पडल्या. छत्र्या घेऊन निघालेल्या पादचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. टोकियोतील काही शाळा दुपारी बंद करण्यात आल्या. पश्चिम जपानमधील टोकियो व ओकायामा दरम्यानची रेल्वेसेवा थांबवण्यात आली होती. दक्षिण जपानमधील विमान वाहतूक आणि प्रवासी नौकासेवा रद्द करण्यात आली.

मवार हे गेल्या वीस वर्षांत गुआम येथे आलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे. बुधवापर्यंत, अवघा २८ टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार निम्मा पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, पेट्रोलसाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वीजपुरवठा पूर्ववत होण्यास अजून चार ते सहा आठवडे लागू शकतात. नेमकी किती घरे उद्ध्वस्त झाली आहेत, याचा तपशील समजू शकला नाही.

Story img Loader