तेलंगणात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पक्षांतर करावं यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या चार आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यांनीच पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आणि यानंतर ही कारवाई करण्यात आली. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी महत्त्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजीज नगर येथील फार्महाऊसमध्ये बुधवारी संध्याकाळी कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. “आमदारांनी पोलिसांना फोन करुन आपल्याला पक्षांतरासाठी प्रलोभनं दिली जात असल्याची तक्रार केली होती. पक्षांतरासाठी आपल्याला मोठी रक्कम, पदं दिली जात आहेत असं त्यांनी सांगितलं,” अशी माहिती पोलीस प्रमुख स्टीफन रवींद्र यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले “स्वत:च्या समाधानासाठी…”

ताब्यात घेण्यात आलेले खोट्या ओळखीच्या आधारे हैदराबादला आले असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपण पुजारी, संत आणि व्यावसायिक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ज्या आमदाराच्या फार्महाऊसवर कारवाई करण्यात आली, त्यांचा तक्रारदार म्हणून उल्लेख करणयात आला आहे. तसंच चारही आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं आहे.

२०१९ पासून राज्यात भाजपा ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे या दाव्याला बळ मिळालं आहे. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेत बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं आहे.

हेही वाचा – ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर मुस्लीम IAS अधिकाऱ्याने पाकिस्तानला सुनावलं; म्हणाले “फक्त भारतातच…”

नुकतंच, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपा दिल्ली आणि पंजाबमधील आमदारांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला होता. ऑगस्ट महिन्यात एका भाजपा नेत्याने तेलंगण राष्ट्र समितीचे १८ आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, भाजपाने सर्व आरोप फेटाळले असून मुख्यमंत्री लक्ष विचलित करण्यासाठी घोडेबाजार झाल्याचा आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trs mla offered money to change party three persons detained from farmhouse telangana police operation lotus sgy
Show comments