आयएएस अधिकारी अशोक खेमका यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांची ४६ व्यांदा बदली करण्यात आली. खेमका यांनी ट्विटवरून याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत, हा प्रकार अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. अनेक मर्यादा आणि अंतर्गत हितसंबंध असलेल्या वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि बदल करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सध्या वाहतूक विभागाच्या आयुक्त आणि सचिवपदाची धुरा सांभाळत असलेल्या अशोक खेमका यांच्या बदलीचे आदेश बुधवारी हरियाणा सरकारतर्फे काढण्यात आले. हरियाण सरकारने आता त्यांची रवानगी पुरातत्व आणि संग्रहालय विभागात केली आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हरियाणातील मनोहरलाल खट्टर यांचे सरकार खेमका यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराज असल्याने ही बदली करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
हरियाणातील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर खेमका यांनी ‘कागदपत्रांची अफरातफर’ करून सदर जमिनीची खरेदी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर अशोक खेमका प्रचंड चर्चेत आले होते. त्यामुळे खेमका यांच्यावर हरियाणाच्या तत्कालीन राज्य सरकारने विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतर भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर खेमका यांची बदली वाहतूक विभागात करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी खेमका यांच्या कामाचे जाहीरपणे कौतुकही केले होते. मात्र, खेमका कार्यरत असलेल्या वाहतूक विभागाच्या आयुक्तपदाची इतर अनेकजणांना अभिलाषा होती. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात १० वर्षे या पदावर कार्यरत असणारे एस.एस. धिल्लोन यांना पुन्हा एकदा या पदावर आणण्यासाठी आताच्या भाजप सरकारनेही अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळेच अशोक खेमका यांची पुरातत्व आणि संग्रहालय विभागात बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

Story img Loader